क्रिकेट या खेळावर माझा कोणताही राग नाही हे आधीच सांगतो. लहानपणी शाळा बुडवून चौकातल्या पान टपरीवरच्या रेडिओवर लावलेले कसोटी सामन्याचे समालोचन कानात प्राण आणून ऐकले आहे. क्रिकेट खेळाचे नियम वगैरे तेव्हा ठाऊक नव्हते आणि आताही ठाऊक नाहीत.
पण आपल्या फलंदाजाने फोर किंवा सिक्स मारली की आनंद झाला पाहिजे, त्याने हाफ किंवा फुल्ल सेंचुरी मारली की तोंडात बोटं घालून शिट्टी वाजवली पाहिजे आणि शत्रूचा फलंदाज आऊट झाला की आनंदाने नाचलं पाहिजे एवढं तेव्हा समजत होतं. हळूहळू किंचित जास्त कळायला लागलं. तेव्हा आधी सुनील गावसकर आवडायला लागला. नंतर सचिन. गांगुली सामना जिंकल्यावर शर्ट काढून लॉर्डस्च्या पॅव्हेलिनमध्ये नाचला तेव्हा आनंदाने हसू आलं.
नियतकालिकात वगैरे ठिकाणी डॉन ब्राडमन, नरी कॉन्ट्रक्टर, संदीप पाटील, सोबर्स वगैरेंचे किस्से वाचून चकित होत राहिलो. थोडी सहिष्णुता अंगी उगवली होती. त्यामुळे इतर देशातलेही खेळाडू आवडायला लागले. सगळय़ात शेवटी मनापासून राहुल द्रवीडच्या प्रेमात पडलो. माझ्या साठीच्या आसपास तो क्रिकेटमधून हळूहळू बाहेर पडला आणि मी रसिकांच्या खुर्चीवरून हळूहळू उठून क्रिकेटला रामराम ठोकला. सध्या क्रिकेटच्या बातम्या वाचतो, बघतो. पण रेहमान वगैरे लोकांची गाणी कितीही गोड असली तरी ती एसडी-आरडी-जयदेवच्या श्रोत्यांना भुरळ घालत नाहीत तसे हे नवे विराट वगैरे लोक आता परके वाटतात.
तेव्हा आपला क्रिकेटवर अजिबात राग नाही. दोनच योगायोग परवा आठवले आणि खटकले.
पूर्वी चर्चिलचे एक चरित्र वाचले तेव्हा त्यात एका बातमीचे कात्रण पाहिले होते. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमावर विनाशकारी अणुबॉम्ब टाकला. त्याच दिवशी लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटी सामना सुरू झाला. 7 ऑगस्टच्या वर्तमानपत्रात बॉम्बची बातमी आणि खाली कसोटी सामन्याचा धावफलक दिला होता. गेल्या आठवडय़ात अमेरिकेच्याच कृपेने अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता ग्रहण केली. यावेळी तालिबानची बातमी पहिल्या पानावर आणि मागच्या पानावर लॉर्डसच्याच मैदानावर झालेला भारत-इंग्लंड कसोटी सामन्याची बातमी. अजब योगायोग किंवा बोलाफुलाला गाठ पडल्याच्या गोष्टी. दुसरे काय बोलणार.








