आशियाई युवा-कनिष्ठ बॉक्सिंग चॅम्पियनशिप – अभिमन्यू, दीपक, प्रीतीसह उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुबईमध्ये सुरू असलेल्या एएसबीसी आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या बिश्वामित्र चाँगथमने 51 किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठली आहे. याशिवाय अन्य तीन भारतीयांनीही उपांत्य फेरी गाठत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
विश्व युवा चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या बिश्वामित्रने कझाकच्या केन्झे मुरातलवर चपळ हालचाली आणि तांत्रिकतेच्या आधारे 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. याशिवाय अभिमन्यू लॉरा (92 किलो गट), दीपक (75 किलो गट), प्रीती (57 किलो गट) यांनीही आपापल्या गटातून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.
मिडलवेटच्या उपांत्यपूर्व फेरीत दीपकने इराणच्या धुरघम करीमवर प्रारंभापासूनच एकतर्फी वर्चस्व गाजवले. तिसऱया फेरीत त्याने ठोशांचा इतका भडिमार करीत करीमला नामोहरम केले की रेफरींना ही लढत अखेर थांबवावी लागली. हरियाणाचा राष्ट्रीय चॅम्पियन अभिमन्यूने शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविताना किर्गिजस्तानच्या तेनिबेकोव्ह संजारचा एकतर्फी पराभव केला. रेफरींनी दुसऱया फेरीतच ही लढत थांबवून (आरएससी) अभिमन्यूला विजयी घोषित केले.
महिला विभागात प्रीतीने 57 किलो वजन गटाच्या लढतीत मंगोलियाच्या तुग्सजार्गल नोमिनवर दुसऱया फेरीत आरएससीद्वारे विजय मिळविला. आदित्य जंघू (86 किलो गट) या एकमेव भारतीय बॉक्सरला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. कझाकच्या तेम्रलान मुकातायेव्हकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेच्या तिसऱया दिवशी भारताचे एकूण सहा बॉक्सर रिंगणात दिसतील. त्यात क्रिश पाल (46 किलो), आशिष (54 किलो), अंशुल (57 किलो), प्रीत मलिक (63 किलो), भरत जून (81 किलोवरील) यांचा समावेश आहे. या सर्वांच्या उपांत्यपूर्व लढती होतील तर गौरव सैनी (70 किलो गट) याची उपांत्य लढत होणार आहे.
कोरोना महामारीमुळे स्पर्धा होऊ न शकल्याने बॉक्सर्सना सुमारे दोन वर्षे रिंगणापासून दूर रहावे लागले होते. या आशियाई स्पर्धेमुळे नवोदित युवा प्रतिभावंताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळण्याची सोय झाली आहे. युवा गटात सुवर्ण मिळविणाऱया बॉक्सरला 6000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे तर रौप्यविजेत्यास 3000 व कांस्यविजेत्यास 1500 डॉलर्स बक्षीस मिळणार आहे. कनिष्ठ गटातील विजेत्याला 4000, रौप्यविजेत्यास 2000 व कांस्यविजेत्यास 1000 डॉलर्स दिले जाणार आहेत.









