प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेचे या कलावधीतले अखेरचे दोन दिवसांचे अधिवेशन येत्या दि. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्यपालांनी त्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
या अधिवेशनानंतर सर्वच राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या कामाला पूर्णतः स्वतःला झोकून घेतील. गेल्या अधिवेशनात संमत केलेल्या भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकावर दुरुस्ती करणारे विधेयक आणण्याचा सरकारचा इरादा आहे मात्र सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंसह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सदर विधेयक पूर्णतः मागे घ्यावे अशी सूचना केली आहे. हे विधेयक राज्य विधानसभेत मागील अधिवेशनात संमत झाले होते. त्यानंतर ते राज्यपालांकडे संमतीसाठी पाठविले आहे. राज्यपालांनी अद्याप त्याला संमती दिलेली नाही.
दोनच दिवसांचे अधिवेशन असले तरीही विरोधकांसाठी आयतीच संधी त्यामुळे प्राप्त होईल. विरोधक या अधिवेशनात देखील फार आक्रमक होतील. दोन दिवसांच्या या अधिवेशनात सरकारतर्फे अनेक कायदे संमतीसाठी घेतले जाणार आहेत.









