प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांच्या सुरक्षित उड्डाणासाठी तसेच भ्रमंतीसाठी डीव्हीओर यंत्रणा प्रणाली स्थापित करण्यात आली असून ती कार्यरत करणारा देशातील दाबोळी हा पहिला विमानतळ ठरला आहे.
डॉपलर व्हेरी फ्रिक्वेंसी ओमनी रेंज अर्थात डिव्हीओर असे त्या प्रणालीचे नाव असून विमानतळ संचालक गगन मलिक यांनी त्या संदर्भात माहिती दिली.
या प्रणालीची एकूण किंमत रु. 5 कोटी असून तेवढा खर्च झाला आहे. हवाई वाहतूक नियंत्रण, आगमन – निर्गमन व विमानाच्या इतर सर्व प्रक्रियांसाठी सदर प्रणाली काम करणार आहे. हे तंत्रज्ञान देशात प्रथमच वापरण्यात आले असून ते पूर्णपणे अत्याधुनिक आहे.
विमानतळ – धावपट्टी येथे विमानांची हवाई वाहतूक नियंत्रित करण्याचे काम सदर यंत्रणा करणार आहे. त्याचे संदेश या प्रणालीतून पाठवले जाणार आहेत. ती यंत्रणा तशी जुनीच असली तरी त्यात सुधारणा करुन तिचा वापर करण्यात येणार आहे. गोव्यातील दाबोळी विमानतळास त्या यंत्रणेचा पहिला मान मिळाल्याचे मलिक यांनी सांगितले.









