वृत्तसंस्था/ किंग्स्टन
आयसीसी अध्यक्षपदाच्या रिंगणात आता क्रिकेट वेस्ट इंडीजचे माजी अध्यक्ष डेव्ह कॅमेरॉनही उतरले आहेत. शशांक मनोहर यांची मुदत संपल्याने ही निवडणूक जुलैमध्ये होणार आहे.
आयसीसी अध्यक्षपदासाठी कॅमेरॉन यांची शिफारस करणार असल्याचे अमेरिका क्रिकेट हॉल ऑफ फेमने अलीकडेच शशांक मनोहर यांना सूचित केले होते. ‘गुणवत्तेनुसार संघांची कमाई होऊ शकेल, असे टिकाऊ आर्थिक मॉडेल शोधण्याची गरज आहे, असे मला वाटते. क्रिकेट जगतातील तीन बडे देश भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्याकडे अनेक स्पर्धा आहेत, प्रेक्षकांची साथ आहे आणि उत्तम अर्थव्यवस्थाही आहे. त्यामुळे त्यांना महसूल मिळण्यात अडचण येत नाही. पण लहान देशांना आर्थिक मदतीसाठी नेहमी आयसीसीकडेच धाव घ्यावी लागते. त्यामुळे आम्हाला महसुलातील समान हिस्सा मिळाला नाही तरी चालेल. पण न्याय्य हिस्सा जरूर मिळावा, अशी आमची इच्छा आहे,’ असे कॅमेरॉन म्हणाले. ते 2013 ते 2019 या कालावधीत क्रिकेट वेस्ट इंडीजच्या अध्यक्षपदी होते.
आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॅमेरॉन यांना दोघांकडून पाठिंबा मिळण्याची गरज आहे. त्यांना विंडीजचे विद्यमान अध्यक्ष रिकी स्केरिट यांचा पाठिंबा मिळेल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. कारण अलीकडेच त्यांच्यात जाहीर वाद झाला होता. मनोहर यांची मुदत संपल्याने अध्यक्षपदाची निवडणूक जुलैअखेरीस आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतली जाणार आहे. या पदासाठी सध्या ईसीबीचे अध्यक्ष कॉलिन गेव्हस यांचे नाव आघाडीवर असून बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. आयसीसी अध्यक्षपद मिळाल्यास क्रिकेटचा अमेरिकेत प्रसार करण्यावर अधिक भर देणार असल्याचे कॅमेरॉन यांनी सांगितले. ‘अमेरिकन अर्थव्यवस्था फार मोठी असून त्याचा लाभ उठविण्यासाठी क्रिकेटच्या एकंदर संरचनेत बदल करण्याची आणि त्याकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे,’ असे त्यांचे मत आहे.









