खबरदारीसाठी चाचणी केल्यामुळे अनर्थ टळला
पुणे / प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त पुणे जिल्हय़ातून संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव आणि श्री चांगवटेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळय़ात सहभागी होणाऱया 80 व्यक्तींची जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 4 व्यक्तींच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांना आता पालखी सोहळय़ात सहभागी होता येणार नाही.
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आळंदी येथून, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथून, श्री संत सोपानदेव आणि चांगावटेश्वर महाराज यांच्या पादुका सासवड येथून अशा चार संताच्या पादुका मंगळवारी पुणे जिल्हय़ातून एसटीतून पंढरपूरकडे नेण्यात येणार आहेत. या प्रत्येक पालखी सोहळय़ात केवळ 20 व्यक्तींना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वरील चार पालखी सोहळय़ात सहभागी होणाऱया सर्व 80 व्यक्तींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 4 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने प्रशासनाकडून तातडीने संबंधित विश्वस्तांना कळविण्यात आले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे मात्र मोठा अनर्थ टळला आहे.








