नॉर्थ साऊंड / वृत्तसंस्था
विंडीज संघाने श्रीलंकेविरुद्ध शनिवारी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 असा एकतर्फी कब्जा केला. येथे प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लंकेने 50 षटकात 8 बाद 273 धावा केल्या तर प्रत्युत्तरात विंडीजने 49.4 षटकात 5 गडी बाकी राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयासाठी 274 धावांचे कडवे आव्हान असताना विंडीजने देखील तोडीस तोड प्रत्युत्तर देत 2 चेंडूंचा खेळ बाकी राखत विजयाचे लक्ष्य गाठले. विंडीजतर्फे इव्हिन लुईसने 121 चेंडूत 103 धावांचे योगदान दिले. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. याशिवाय, शाय होपने 108 चेंडूत 84 धावा जमवल्या.
लंकेने 8 बाद 273 धावा केल्या, त्यात दनुष्का गुणतिलकाची 96 चेंडूतील 96 धावांची खेळी लक्षवेधी ठरली. दिनेश चंडिमलने 98 चेंडूत 71 तर पिन्नदुवगे डीसिल्वाने 47 धावांचे योगदान दिले. जेसॉन मोहम्मदने 47 धावात 3 तर अल्झारी जोसेफने 42 धावात 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका ः 50 षटकात 8-273 (दनुष्का गुणतिलका 96 चेंडूत 96, दिनेश चंडिमल 98 चेंडूत 71, पिन्नदुवगे डीसिल्वा 31 चेंडूत 47. जेसॉन मोहम्मद 10 षटकात 3-47, अल्झारी जोसेफ 2-42).
विंडीज ः 49.4 षटकात 5-274 (इव्हिन लुईस 121 चेंडूत 103, शाय होप 108 चेंडूत 84, निकोलस पूरन नाबाद 35. अवांतर 10. नुवान प्रदीप 9.4 षटकात 2-66, थिसारा परेरा 7 षटकात 2-45, लक्सन संदकन 1-36).









