वार्ताहर/ औंध, पुसेसावळी
वर्धन हा एक ब्रँड म्हणून नावारूपास येतोय. आज देशातील डी मार्टच्या प्रत्येक स्टोअरपर्यंत वर्धनची साखर आणि जागरी पावडर पोहचली आहे. भविष्यात अजून नवीन उद्योग येथे येणार असून. हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. वर्धन ऍग्रो कारखाना कार्यस्थळावरती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांच्या हस्ते गळीत हंगाम 2021-22 चा रोलर पूजन संपन्न झाले.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले, गत गळीत हंगामात अधिकारी कामगारांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे हंगाम चांगला पार पडला. यावर्षी सुद्धा कारखाना लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती मेंटेनन्सची कामे वेळेत पूर्ण करून सप्टेंबरमध्ये कारखाना सुरू करणार आहोत. यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. गत हंगामातील पहिला हप्ता 20 दिवसात ऊस उत्पादक शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग केल्यामुळे शेतकरी बांधवामध्ये समाधानाचे वातावरण आहे. वर्धनमध्ये काम करणारा कर्मचारी हा पहिल्यापासून कारखान्यासाठी झटतोय त्यांना सुद्धा अभिमान वाटेल अश्या पद्धतीने वर्धनची वाटचाल सुरू आहे. माझ्यावरती प्रेम करणारा प्रत्येक घटक राजकारणातील असो, समाजकारणातील असो किंवा कारखानदारीमधील असो काल ही माझ्या बरोबर होता आजही आहे आणि उद्या ही राहील. सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाने मी आज येथे आहे. आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले की, धैर्यशील दादांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना झेप घेण्यासाठी सज्ज आहे. कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी तोडणी वाहतुकीचे करार पूर्णत्वास आलेले आहेत. कंत्राटदारांना पहिला हप्ता खात्यावर वर्ग केला असून यंत्रणा ऑगस्ट अखेर कारखान्यावर दाखल होणार आहे. भागातील तोडणी वाहतूकदार करार करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधावा. तसेच ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कारखाना कर्मचाऱयांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने ऊस नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डूबल, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, चीफ केमिस्ट सुनील कोकितकर, शेती अधिकारी वैभव नलवडे, लेबर ऑफिसर रणजित चव्हाण, आयटी मॅनेजर चंद्रकांत खराडे, स्टोअर किपर संतोष ननावरे, परचेस ऑफिसर अश्विन कदम, गोडावून किपर महादेव यादव, अकौंटंट रवी पवार व कर्मचारी उपस्थित होते.








