वृत्तसंस्था/ ब्युनॉस आयर्स
भारताच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाने शानदार प्रदर्शन केले तरी जागतिक द्वितीय मानांकित अर्जेन्टिनाकडून त्यांना 2-3 अशा निसटत्या गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.
शर्मिला (34 वे मिनिट), व गुरजित कौर (40) यांनी गोल नोंदवत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्याआधी 25 व्या मिनिटाला मिकेला रेटेगुईने अर्जेन्टिनाला आघाडीवर नेले होते. शेवटच्या सत्रात अर्जेन्टिनाने लागोपाठ दोन गोल नोंदवून भारतावर 3-2 अशी घेत अखेर याच फरकाने विजयही साकार केला. 50 व्या मिनिटाला ऑगस्टिना गॉर्झेलानीने व 57 व्या मिनिटाला ग्रॅनाटो मारियाने हे गोल नोंदवले. ‘आम्ही जिंकण्याच्याच स्थितीत होतो. पण अर्जेन्टिनासारख्या अव्वल संघाविरुद्ध अखेरच्या क्षणापर्यंत सावध राहणे आवश्यक असते. चारही सत्रात खेळात राखलेले सातत्य हे या सामन्याचे वैशिष्टय़ होते,’ असे भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक सोएर्द मारिने यांनी सामन्यानंतर म्हटल्याचे हॉकी इंडियाने सांगितले.
सहाव्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवित अर्जेन्टिनाने भारताला बॅकफूटवर टाकले असले तरी भारतीय गोलरक्षक सविताने अप्रतिम गोलरक्षण करीत भारतावरील हा धोका टाळला होता. दुसऱया सत्रातही अर्जेन्टिनाने भारतावर दडपण राखत संधी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना 21 व 23 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरही मिळाले. पण भारतीय बचावफळीने भक्कम बचाव करीत त्यांचे प्रयत्न फोल ठरविले. रेटेगुईने मात्र पेनल्टी कॉर्नरवरच गोल नोंदवून अर्जेन्टिनाला पहिले यश मिळवून दिले. मध्यंतराच्या दहा मिनिटांच्या ब्रेकनंतर भारताने जोरदार पुनरागमन करताना शिस्तबद्ध खेळ केला आणि 25 यार्ड क्षेत्रात पोकळी न ठेवता अर्जेन्टिनाला आपल्या सर्कलमध्ये येण्यापासून रोखले. आघाडी फळीने आपले काम चोख बजावताना 34 व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधून दिली. नवज्योत कौरने पुरविलेल्या चेंडूवर शर्मिलाने जोरदार फटका लगावत हा गोल नोंदवला. 38 व्या मिनिटाला अर्जेन्टिनाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर भारताने फोल ठरविला. पण 40 व्या मिनिटाला गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघांनी नंतर काही पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही. 50 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर अर्जेन्टिनाने बरोबरी साधल्यानंतर मात्र सामन्याचा नूर पालटला आणि 57 व्या मिनिटाला त्यांनी विजयी गोल नोंदवला.









