वार्ताहर/ कराड
वनवासमाची, किल्ले सदाशिवगड (ता. कराड) येथे सोमवारी रात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घालत गावातील सहा घरे फोडली. तर अमोल पवार यांना शस्त्रांचा धाक दाखवत सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने व 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थांनी रात्रभर शोधमोहीम राबवली मात्र चोरटे सापडले नाहीत. या घटनेने सदाशिवगड विभागात भीतीचे वातावरण पसरले आहे. अमोल दिलीप पवार यांनी याबाबत कराड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वनवासमाची येथे सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरटय़ांनी काशिनाथ तात्या पाटील, भागिर्थी रामचंद्र माने, दत्तात्रय ज्ञानू शिंदे, शंकर हरी कदम, विकास बंडू भंडारे व अमोल दिलीप पवार याच्या दाराच्या कडी, कोयंडे तोडून व खिडकीतून घरात प्रवेश केला. यातील पाच घरांत चोरटय़ांनी साहित्य उचकटून शोधाशोध केली, मात्र चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. अमोल पवार यांच्या घरातील 9 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजारांची रोकड घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. काशिनाथ पाटील यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. चोरटय़ांनी कपाटातील साहित्य उचकटून शोधाशोध केली. तर घरात असलेली एक साधी सुटकेस व मिलिट्रीतील पेटी चोरटय़ांनी उचलून नेऊन घरासमोर असलेल्या ओढय़ात उघडली. त्यात काहीच सापडले नसल्याने बॅगा व साहित्य तिथेच टाकून चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विजय गोडसे तत्काळ वनवासमाची येथे पोहोचले. पोलीस व ग्रामस्थांच्या माध्यमातून वनवासमाचीच्या दोन किलोमीटर परिसरात रात्रभर शोधमोहीम राबवली मात्र चोरटे पसार झाले. यावेळी वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, पोलीस पाटील प्रकाश पाटील, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, पोलीस पाटील सतीश काशिद उपस्थिती होते. डिवायएसपी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी वनवासमाची येथे भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. सोमवारी सकाळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. ओगलेवाडी पोलीस दुरक्षेत्राचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे तपास करीत आहेत.
अमोल पवार यांना मारहाण
अमोल पवार यांच्या घराच्या खिडकीतून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. यावेळी एका चोरटय़ाचा पाय अमोल यांच्या आईच्या हातावर पडल्याने त्या जाग्या झाल्या. त्या ओरडू लागल्याने अमोल जागा झाला. त्यावेळी दोन चोरटय़ांनी शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली. त्याचवेळी अमोलचा भाऊ किशोरजवळ तीन चोरटे होते. तर घराच्या बाहेर एक चोरटा असल्याचे सांगण्यात आले. सर्व चोरटय़ांनी तोंडाला मास्क बांधले होते. ते मराठीत बोलत होते.
ओगलेवाडीत दोन दुकानात चोरीचा प्रयत्न
ओगलेवाडीच्या भाजीमंडईत असलेले शिवदास फुटवेअर या दुकानाचे लोखंडी दरवाजे उचकटून चोरटय़ांनी दोन चप्पलचे जोड व एक कापडी पिशवीचा बंडल पळवला. तर चौकात असलेल्या फळाच्या दुकानाचे दरवाजे उचकटण्याचाही प्रयत्न चोरटय़ांनी केला.








