प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव-यरमाळ रस्त्याची डागडुजीविना दुरवस्था झाली आहे. रस्त्यामध्ये पडलेले भले मोठे खड्डे, पसरलेली खडी यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. मध्यंतरी रस्त्यावर माती टाकून सपाटीकरण करण्यात आले. परंतु हे कामही मागील काही महिन्यांपासून ठप्प आहे. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त केव्हा मिळणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहापूर शिवारात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा मार्ग म्हणजे वडगाव-यरमाळ रस्ता. याच मार्गाने यरमाळ, अवचारहट्टी, देवगणहट्टी, मासगोंडहट्टी, नागेनहट्टी, के. के. कोप्प, नागेरहाळ या परिसरातील नागरिक ये-जा करीत असतात. बेळगाव शहराला येण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने वर्दळ असते. 13 ते 14 वर्षांपूर्वी ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षे रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु मागील काही वर्षांपासून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे रात्री अपघात घडत आहेत. दररोज ये-जा करणाऱया शेतकऱयांनाही या सर्वांचा सामना करावा लागत आहेत. रस्ता डांबरीकरणासाठी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या निरपराध्याचा जीव जाण्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.









