पावसाच्या तडाख्यापाठोपाठ यंदा थंडीचा कडाकाही अधिक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला अंदाज प्रत्यक्षात यायला सुरुवात झालेली दिसते. देशातील सध्याची स्थिती बघता थंडीची चादर हळूहळू सर्वदूर पसरते आहे. उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असून, महाराष्ट्र, कर्नाटकसह लगतच्या भागातही तिची चाहूल लागलेली पहायला मिळते. त्यामुळे पुढचा टप्पा हुडीहुडी भरवणारा असेल, हे आता गृहितच धरायला हवे. ला लिना आणि अल निना हे दोन घटक हवामानशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. अल निना हा प्रामुख्याने मोसमी पावसावर परिणाम करत असतो. त्याच्या अडथळय़ांपासून मुक्तता मिळाली, तरच पावसाचे चक्र अबाधित राहण्याचा संभव अधिक असतो तर ला निना हा घटक मुख्यत: थंडीवर परिणाम करतो. अल निना अंतर्गत समुद्राचे पाणी गरम होते, तर ला निनामध्ये हे पाणी थंड होते. त्यातून गारवा वाढून शीतलहरी निर्माण होतात. स्वाभाविकच वातावरणावर त्याचा परिणाम होतो. यंदा ला निनाच्या सक्रियतेमुळे थंडीची तीव्रता अधिक राहण्याचा अदमास हवामान विभागाच्या महासंचालकांनी अलीकडेच व्यक्त केला होता. त्यानुसार, दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये शीतलहरी निर्माण झालेल्या दिसतात. स्वाभाविकच या परिसरातील तापमान लक्षणीयरीत्या खाली आले आहे. दिल्लीतील किमान तापमान 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत घटले असून, सर्वाधिक थंड म्हणून मागच्या दोन दिवसांची नोंद झाली आहे. स्वाभाविकच पुढच्या लाटांपासून आता सावध रहावे लागेल. मागच्या मार्चपासून देशभर कोरोनाने दहशत पसरवली आहे. योग्य नियोजनामुळे दिल्लीने कोरोनावर लवकर नियंत्रण मिळविले असले, तरी आता थंडीचा मोसम त्यांच्यासाठी अधिक कसोटीचा असेल. दिल्लीत मागच्या आठवडय़ापासून मोठय़ा प्रमाणात या आजाराच्या रुग्णांची भर पडत असल्याचे दिसून येते. एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आताचे हे आकडे पाहता यास दुसरी लाट, असेच संबोधले आहे. लाटेचा प्रवास सौम्यतेकडून आता तीव्रतेकडे सुरू असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांचा हा इशारा अनेकार्थांनी गांभीर्याने घ्यायला हवा. थंडीचा हंगाम हा कोरोनाकरिता तसा अनुकूल मानला जातो. त्यात या कालावधीत राजधानी दिल्लीतील प्रदूषणातही लक्षणीय वाढ असते. यातून हवेमध्ये हा विषाणू अधिक काळ राहून कोरोनाचा धोका निश्चितपणे वाढण्याची भीती तज्ञजन व्यक्त करतात. अलीकडच्या काही दिवसात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्रच कोरोनाबद्दल एकप्रकारची बेफिकिरी दृष्टीपथात येते. गजबजलेल्या बाजारपेठा, सण, समारंभ वा कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, मास्क न घालताच फिरणारी मंडळी हे एक सार्वत्रिक चित्र बनले आहे. म्हणूनच कोरोना हद्दपार झाल्यासारखी वर्तणूक ठेवून चालणार नाही. थंडीमध्ये तर उत्तरेबरोबरच मध्य व दक्षिण भारतवासियांनीही विशेष दक्षता घ्यावी. देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई व पुण्यातील कोरोना साथीचा जोर मागच्या काही दिवसांपासून बऱयापैकी ओसरला आहे. येथील मृत्यूदरही आता अर्धा अधिक घटलेला दिसून येईल. ही नक्कीच दिलासादायक बाब ठरते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हणतात. आरोग्य मंत्र्यांचे हे विधान नक्कीच सकारात्मक व उमेद वाढविणारे म्हणता येईल. किंबहुना, त्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन केले पाहिजे. दिवाळसण तोंडावर आल्याने बाजारपेठा माणसांनी फुलू लागल्या आहेत. परंतु, बाजारहाट करताना लोकांनी अधिकची काळजी घ्यावी. मास्क वापरण्यासह सॅनिटायझिंग, सोशल डिस्टन्सिंग हा आता जीवनशैलीचा भाग बनला आहे, हे कुणी विसरू नये. आता कोरोना गेला, असे समजून गाफिल राहणे खूप महाग पडू शकते. शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्जच राहणार असल्याचेही टोपे सांगतात. तेदेखील अपेक्षितच होय. परंतु, यापुढे आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम व सदृढ कशी होईल, यावर कटाक्ष ठेवावा लागेल. एखादे संकट आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा त्याआधीच सोयीसुविधा निर्माण कशा करता येतील, यादृष्टीने पावले पडायला हवीत. युरोपातील देशांना सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेने तडाखा दिल्याने अनेक देशांना पुन्हा लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा लागला आहे. भारतासारख्या देशात लॉकडाउनचा पर्याय पुनः पुन्हा निवडणे घातक ठरू शकते. आधीच या दुष्टचक्राने अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. लाखमोलाची माणसे गेलीच. शिवाय जी राहिली, त्यांचे जगणेही अत्यंत अस्थिर व बेभरवशी बनले आहे. म्हणूनच अर्थचक्र गतिमान व्हायला हवे. वाहन विक्रीतील वाढ, जीएसटी कलेक्शन या बाबी तशा उत्साहवर्धक. महाराष्ट्रात झालेली 35 हजार कोटींची गुंतवणूक हेही तसे सुचिन्हच. तथापि, रोजगार मोठय़ा संख्येने वाढावेत, त्यातूनच क्रयशक्ती वाढेल. बाजार खेळता राहून सर्व स्तरावर अनुकूल वातावरण निर्माण होईल. माणूस आणि संघर्ष हे समीकरणच आहे. लाटा येत जात, राहतील. एकतर अशी लाट येऊच न देणे आणि आलीच तर सर्वशक्तीनिशी तिचा सामना करणे, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व आधुनिक आयुधांसह आपल्याला कायम सज्ज रहावे लागेल. त्याचबरोबर दिवाळीसारखा सण साजरा करताना काही व्यवधाने पाळावी लागतील. फटाक्यांच्या आतषबाजीतून दरवर्षी हवा व ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ होते. तसेच श्वसनाला वा फुफ्फुसांना त्रास होऊन अनेकांसाठी आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. कोविड काळात याबाबत अधिकाधिक जागरुकता वाढायला हवी. आताची लढाई ही थेट माणसाला आव्हान देणाऱया महाकाय लाटांशी आहे, याचे भान प्रत्येकानेच ठेवायला पाहिजे. याकरिताच सकारात्मक, नकारात्मकतेपलीकडे जाऊन प्रत्येकाने वास्तववादी व्हायला हवे. त्यातूनच खऱया अर्थाने आपल्याला नेमकी दिशा सापडेल. नवा दिवस उगवेल…!
Previous Articleरत्नागिरी : खेडच्या जगबुडीत सर्पमुखी माशाचा शोध
Next Article चीनकडून अँट समूहावर निर्बंधाचे संकेत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








