दुर्मीळ प्रजातीचे ‘चन्ना रारा’ नामकरण, झूलॉझिकल सर्वे ऑफ इंडियाच्या तिघांचे संशोधन, जगबुडी नदी पुन्हा जगाच्या नकाशावर झळकली
राजू चव्हाण / खेड
जगबुडी नदीपात्रात सापासारखे लांब शरीर, मोठे तोंड, अन् चमकदार दात असलेल्या सर्पमुखी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. झूलॉझिकल सर्वे ऑफ इंडियाच्या तिघांनी ही नवी प्रजात शोधून काढली आहे. या नव्या प्रजातीचे ‘चन्ना रारा’ असे नामकरण करण्यात आले आहे. परिसंस्थेच्या दृष्टीने हा मासा जमिनीवर व पाण्यात राहत असल्याने त्याला उभयचर गटात समाविष्ट करण्यात आले आहे. या नव्या संशोधनामुळे जगबुडी नदी पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर झळकली आहे.
जगबुडी नदी वाशिष्ठी नदीतून बाहेर पडणारी नदी आहे. ही नदी बहिरवली येथून सुरू होते अन् मौजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येवून मिळते. जगबुडी नदीची लांबी ४५ कि.मी. तर रूंदी संगमाजवळ १६५ चौ. कि.मी. इतकी असल्याचे जाणकार सांगतात. अतिवृष्टीत जगबुडी नदी सातत्याने चर्चेत राहिली आहे. जगबुडी नदीपात्रात सापासारखे तोंड असलेल्या सर्पमुखी माशाच्या नव्या शोधामुळे ही नदी आता अवघ्या जगात डंका पिटणार आहे.
झूलॉझिकल सर्वे ऑफ इंडियाचे निलेश डहाणूकर, व्ही.के. अनुप, अन्वर अली या तिघांनी जगबुडी नदीपात्रात सर्पमुखी माशाची नवी प्रजात शोधून काढण्याची किमया केली आहे. यासाठी गेल्या ४ ते ५ वर्षापासून तिघांचे संशोधन चालू होते. गतवर्षी माशाची नवी प्रजात जगबुडी नदीपात्रात तिघांच्या हाती लागली. जगात अशी प्रजात कुठेच आढळलेली नाही. मात्र, जगबुडी नदीपात्रात खूपच फरक असलेली माशाची नवी प्रजात सापडल्याने ‘चन्ना रारा’ असे नामकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निलेश डहाणूकर यांच्यासह दोन संशोधनकार महाराष्ट्रातीलच आहेत.
सर्पमुखी मासा ३ फूट लांब व ८ किलो ग्रॅम वजनाचा असू शकतो. या माशाच्या १५ ते २० जाती देखील आहेत. या माशाच्या शरीरात श्वसनासाठी फुफ्फुसासारखे लेडर नावाचा अवयव असतो. त्यामुळे हा मासा पाण्याबाहेर दीर्घकाळ जीवंत राहतो. तसेच एका डबक्यातून दुसऱ्या डबक्यात जमिनीवरून सरपटत जावू शकतो. भारतामध्ये हा मासा दख्खनचे पठार व कोकण किनारपट्टीवर गोड्या पाण्यात सापडतो. अमेरिकेने या माशाला खतरनाक वन्यजीव म्हणून घोषित केल्याची माहिती पुढे आली आहे.
संरक्षण अन् संवर्धनाच्या दृष्टीने अवघडच
सर्पमुखी मासा ज्याठिकाणी सापडतो त्याठिकाणच्या परिसंस्थेवर वाईट परिणाम करतो. हा मासा मांसाहारी असल्यामुळे तो परिसंस्थेतील इतर प्राणी खावून नष्ट्र करतो. वर्तमान काळात संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा मासा खूपच अवघड आहे. कारण हा मासा इतर जीव मारून खात असल्याने परिसंस्थेतील अन्नसाखळी खंडित होवू शकते. आयडीसीएनच्या रेड यादीमध्ये असुरक्षित प्रजात म्हणून या माशाची नोंद केली आहे.प्रा. सतिश माने, झूलॉझी विभाग- ज्ञानदीप विद्यानदिर, भडगाव









