ढाका
बांगलादेशने अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांच्या एका विधानावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. बांगलादेश हा दहशतवादी संघटना अल-कायदाचा संभाव्य गड असल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले होते. बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाने पॉम्पियो यांची टिप्पणी दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. तसेच पुराव्यांशिवाय असे आरोप करू नयेत, अशी ताकीदही दिली आहे. अल-कायदा बांगलादेशातून दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. भविष्यात अशाप्रकारचे आणखी अनेक हल्ले केले जाऊ शकतात, असे पॉम्पियो यांनी म्हटले होते. एका वरिष्ठ नेत्याकडून अशाप्रकारची बेजबाबदार टिप्पणी अत्यंत दुर्दैवी आहे. बांगलादेश अशाप्रकारची आधारहीन आणि चुकीची टिप्पणी पूर्णपणे फेटाळतो. बांगलादेशात अल-कायदाच्या अस्तित्वाचे कुठलेच पुरावे नसल्याचा दावा विदेश मंत्रालयाने केला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वात बांगलादेशने दहशतवाद आणि हिंसक कट्टरवादाच्या विरोधात शून्य सहिष्णूतेचे धोरण स्वीकारले आहे. दहशतवादाच्या धोक्यासंबंधी सरकारने प्रत्येक आवश्यक पाऊल उचलले आहे. दहशतवाद विरोधातील आमच्या कामगिरीमुळेच जगभरातून कौतुक होत आहे. दहशतवाद विरोधी लढाईत स्वतःची प्रतिबद्धता पूर्ण करत आम्ही सर्व 14 इंटरनॅशनल काउंटर-टेररिजम कन्व्हेंशनचा हिस्सा झालो आहोत, असे बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.









