‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी केला अर्ज
प्रतिनिधी / बेळगाव
लोंढा ते मिरजदरम्यान रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम सध्या युद्धपातळीवर रेल्वे विभागाकडून सुरू आहे. यामध्ये लोंढा स्थानकानजीक अवघ्या 90 दिवसांमध्ये रोड अंडरब्रिज तयार करण्यात आला आहे. एक वर्ष लागणारे काम अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात आल्याने रेल्वे विभागाने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे विक्रमासाठी अर्ज केला आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोंढा जंक्शन येथे रोड अंडरब्रिज तयार करण्यात येणार होता. नेहमीप्रमाणे तो तयार केल्यास त्याला वर्षाचा कालावधी लागणार होता. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक अजयकुमार सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मलकारे व हुबळी विभागाचे वरि÷ विभागीय अभियंते नीरज बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 90 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे रेल्वे मार्गाच्या दुसऱया बाजूला राहणाऱया नागरिकांनाही ते सोयीचे ठरले आहे.
रेल्वे विभागाने मोठे आरसीसी ब्लॉक तयार करून ते एकमेकाला जोडून रोड अंडरब्रिज तयार केला आहे. दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी या कामाला सुरुवात करण्यात आली होती. दि. 27 डिसेंबरला सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱयांच्या टीमने केलेल्या कामाचे कौतुक होत असून, याच गतीने इतरही कामे पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.









