कंग्राळी खुर्द ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळेच सहा महिन्यांनंतर निवडणूक घ्यावी लागणार
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी मतदार याद्या द्या, अशी मागणी म. ए. समितीच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, त्याची पूर्तता अजूनही करण्यात आली नाही. त्यामुळे निवडणूक अर्ज भरण्यामध्ये सावळा गोंधळ उडत आहे. कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतमधून वॉर्ड क्रमांक 8 मध्ये या गोंधळामुळेच आणि निवडणूक अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. त्यामुळे पुन्हा सहा महिन्यांनंतर येथे निवडणूक घ्यावी लागणार आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचेही मोठे नुकसान होत आहे. तेव्हा अशा अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केली आहे.
कंग्राळी खुर्द येथील ग्राम पंचायतमध्ये वॉर्ड क्रमांक 8 मध्ये केवळ दोनच अर्ज आले होते. सामान्य महिलांनी अर्ज भरायचा होता. त्या ठिकाणी केवळ दोनच अर्ज होते. सुरुवातीला एक अर्ज रद्द ठरविण्यात आला. मात्र, मराठी आणि कन्नड या आकडय़ांमुळे दुसरा अर्जही रद्द झाला आहे. निवडणूक अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
….याचा कोठे तरी गांभीर्याने विचार करावा
मतदार याद्या मराठीत देणे गरजेचे आहे. असे असताना अजूनही त्याची दखल घेण्यात आली नाही, हे मराठी भाषिकांचे दुर्दैव आहे. लोकशाहीच्या देशामध्ये आपल्या भाषेत परिपत्रके मिळत नाहीत, ही खरोखरच खेदाची बाब आहे. एका बाजूला प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात येते. मात्र, दुसऱया बाजूला भाषेतून गोची करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. याचा कोठे तरी गांभीर्याने विचार करावा, असे जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
चिन्ह वाटपामध्येही सावळा गोंधळ आहे. तातडीने चिन्हे दिली नसल्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागला. क्रमांकामध्येही गोंधळ निर्माण झाला. तेव्हा याबाबत गांभीर्याने विचार करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारले. योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी आर. आय. पाटील, ऍड. एम. जी. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. सतीश बांदिवडेकर, बी. डी. मोहनगेकर, पी. डी. पाटील यांच्यासह कंग्राळी खुर्द ग्रामस्थ उपस्थित होते.









