कोरोनाच्या दुसऱया लाटेत बाहेरुन येणाऱया व्यक्तींच्या बाबतीत गांभिर्याने लक्ष घालून क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची सक्तीने कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आपोआपच शहरी भागानंतर आता गावागावात कोरोनाने हातपाय पसरले आहेत.
होमक्वारंटाईन केलेले कोरोना बाधीत रुग्ण लॉकडाऊनचे निर्बंध पाळत नसल्याने लॉकडाऊन नंतरही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात न आल्याने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्हय़ांना रेडझोनमधून बाहेर काढण्यासाठी होमक्वारंटाईनची सुविधा रद्द करण्यात यावी व ग्रामसनियंत्रण कमिटय़ांना एक्टीव्ह करुन प्रत्येक घटकाचा सामावेश करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपाविण्यासाठी जे कडक निर्बंध घातले गेले त्याची अंमलबजावणी मात्र योग्य पद्धतीने झाली नाही. याचाच परिणाम म्हणून दोन महिन्यानंतरही कोरोना नियंत्रणात आणणे दोन्ही जिल्हय़ांना शक्य झालेले नाही. कोरोनाची ही दुसरी लाट थोपाविताना दोन्ही जिल्हय़ाची प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरली आहे. शासनाने लागू केलेले कडक निर्बंध, जनता कर्फ्यू लागू करुनही कोरोना रुग्णसंख्येत घट होण्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही. उलट दोन्ही जिल्हय़ात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट असून रत्नागिरी जिल्हय़ामध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 33 हजारावर पोहोचली असून 1 हजार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 23 हजारावर पोहोचली असून 600 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या दोन्ही जिल्हय़ांची गेल्या वर्षभरातील कोरोनाची परिस्थिती पाहिली तर दोन्ही जिल्हय़ांनी वर्षभरात बऱयापैकी कोरोनावर नियंत्रण ठेवले होते. मात्र गेल्या दोन महिन्यात हे नियंत्रण पूर्ण बिघडून गेले असून दरदिवशी 500 च्या पटीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत तर दरदिवशी 10 ते 12 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. कोरोना रुग्ण वाढ आणि मृत्यू वाढ ही राज्यात दोन्ही जिल्हय़ांची सर्वाधिक असून ही वाढ रोखण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे. म्हणूनच आज राज्यात कोरोना संख्येत काही जिल्हय़ात घट झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार होत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे रेडझोनमध्ये गेल्याने या जिल्हय़ात लॉकडाऊनमधील शिथिलता आणणे कठीण असून त्यासाठी आता कठोर निर्बंधांची गरज आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात वर्षभर कोरोना नियंत्रणात राहिला त्यामध्ये प्रत्येक घटकाचा सहभाग होता. प्रत्येक गावातील ग्रामसनियंत्रण समित्यांनी कोरोना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गावामध्ये बाहेरुन येणाऱया प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून त्या व्यक्तीला अलगीकरणामध्ये ठेवले जात होते. कोरोनाची लक्षणे दिसल्यावर त्यांची कोरोना टेस्ट करुन पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात होते. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात होता. परंतु कोरोनाच्या दुसऱया लाटेत बाहेरुन येणाऱया व्यक्तींच्या बाबतीत गांभिर्याने लक्ष घालून क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची सक्तीने कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आपोआपच शहरी भागानंतर आता गावागावात कोरोनाने हात-पाय पसरले आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी ग्रामनियंत्रण कमिटय़ांना ऍक्टिव्ह करणे फार गरजेचे आहे.
बाहेरुन येणारे विशेषतः रेल्वेने येणाऱया नागरिकांची रॅपिड टेस्ट करुनच त्यांना सोडणे आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये सातत्य दिसून येत नाही. कोरोना नियंत्रणासाठी कडक निर्बंध लावूनसुद्धा आज अनेक लोक विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर काहीवेळा पोलिसांकडून कारवाई होते त्यातही सातत्य असणे आवश्यक आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी शासनाने निर्बंध घातलेले आहेत. परंतु हे निर्बंध पाळले जात नाहीत. म्हणूनच आज दोन्ही जिल्हय़ात अनेक ठिकाणी लग्न समारंभातून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत आणि अनेक लोक त्यामधून मृत्यूमुखी सुद्धा पडलेले
आहेत.
कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ांच्या प्रशासकीय यंत्रणेने तसेच डॉक्टर व आरोग्य यंत्रणेकडून पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. परंतु कोरोना रोखण्यासाठी आज प्रत्येक घटकाचा समावेश असणे फार महत्त्वाचे आहे. दोन्ही जिल्हय़ातील सक्रीय कोरोना रुग्ण संख्या पाहिली तर 10 हजाराच्या आसपास आहे आणि त्यांच्यासाठी खाजगी व शासकीय कोविड सेंटरमधील साधारणतः 4 हजाराच्या जवळपास बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण निर्बंध पाळत नसल्यामुळे हेच रुग्ण आज कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे होमआयसोलेशन बंदच करणे आवश्यक आहे. होम आयसोलेशन बंद झाल्यास कोविड सेंटरमधील बेड सर्व रुग्णांना पुरणार नाहीत हे खरे असले तरी उर्वरित रुग्णांना शाळा, विश्रामगृहे, रिकाम्या इमारती, भक्त निवास, धर्मशाळा याठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केल्यास निश्चितच कोरोनाचा फैलाव रोखला जाईल आणि कोरोना रुग्ण संख्येत घट होऊ शकेल.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामध्ये जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांनी किंवा जिल्हय़ाबाहेर जाणाऱया लोकांना ई-पास बंधनकारक केले आहेत. परंतु त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच जिल्हय़ाबाहेरुन येणाऱया लोकांना 14 दिवसाचे होमक्वारंटाईन करणे व जिल्हय़ात येताना किंवा जिल्हय़ात आल्यावर कोरोना टेस्ट करणे हे सुद्धा बंधनकारक आहे, परंतु याचीही अंमलबजावणी होत नाही. राज्य शासनाच्या नियमावलीनुसार सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास परवानगी आहे. परंतु अनेकवेळा ही वेळ न पाळता काही दुकाने बिनधास्तपणे उघडली जाताना दिसत आहेत. तसेच आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश असतानाही प्रचंड गर्दीत आठवडा बाजार भरले जात आहेत. यामधूनच कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून दोन्ही जिल्हा प्रशासन त्यामुळे कोरोना रोखण्यास हतबल ठरले आहे.
संदीप गावडे








