नवी दिल्ली
बाईक टॅक्सी सेवा देणाऱया रॅपिडोने देशातील प्रमुख सहा शहरांमध्ये रेंटल बाईक सर्व्हिस सुरू केली आहे. बेंगळूर, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि जयपूर या शहरांमध्ये सुरुवातीला सेवा सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत बाईक एक तास, दोन तास, तीन तास, चार तास आणि सहा तास या वेगवेगळय़ा पॅकेजेसमध्ये ग्राहकांना भाडेतत्त्वावर दिली जाते. ज्या पद्धतीने आपल्याला सेवा हवी असेल त्याप्रमाणे ग्राहकांना बाईक बुक करता येते. गाडी बुक केल्यानंतर रॅपिडोकडून ड्रायव्हरची सोय केली जाते. ग्राहकांना त्यांच्या विविध कामांसाठी विविध ठिकाणी जाण्यासाठी रॅपिडोची सेवा उपलब्ध असेल. गेल्या काही महिन्यांमध्ये परवडणारी आणि सोयीस्कर अशी बाईकसेवा मागणीत दिसते आहे. लवकरच या सेवेचा विस्तार शंभर शहरांमध्ये केला जाईल.









