काँग्रेसच्या प्रचाराचा करणार शुभारंभ
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे येत्या शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी गोव्यात येत आहेत. याचवेळी ते गोव्यात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. दरम्यान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह आमदार आलेक्स रेजिनाल्ड तसेच आलेक्स सिक्वेरा हे देखील काँग्रेसच्या नवी दिल्लीतील बैठकीसाठी गेले असून तिथे त्यांनी गोव्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली.
गोव्यासह पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभेसाठी येत्या फेब्रुवारीपासून निवडणुका घेतल्या जाणार असल्याने या पाचही राज्यातील काँग्रेस नेत्यांना तसेच इतर काही राज्यातील काँग्रेस प्रमुखांना बैठकीस बोलाविले होते. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीत यावेळी काँग्रेसला पुन्हा संधी मिळेल. जनता भाजपच्या कारभाराला कंटाळलेली आहे. गोव्यात यावेळी बदल निश्चित असून खुद्द भाजपचे गोव्याचे माजी व मेघालयाचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच गोव्यातील भाजपचे सरकार भ्रष्ट आहे असे जाहीर करून टाकलेले आहे. त्यामुळे काँग्रेस एवढी वर्षे जे काही सांगतेय त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे.
गोव्यात पक्षाने आपल्या एकजुटीवर आधारित पुढे जायचे आहे व जनतेला भाजपचे खरे स्वरुप कळल्याने जनता काँग्रेसच्या बाजूने राहील, तशी वातावरण निर्मितीही करणे आवश्यक आहे व आपसातील मतभेदही मिटविण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या बैठकीत गोवा फॉरवर्डकडे युती करण्यासंदर्भात चर्चा झाली की नाही हे समजू शकलेले नाही. पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे दि. 30 ऑक्टोबर रोजी गोव्यात येत असून ते गोव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गोवा भेटीत एक-दोन नेते तथा आमदार काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.









