वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय फुटबॉल संघातील 23 संभाव्य खेळाडूंचे सराव शिबिर 16 ऑगस्टपासून कोलकात्यात होणार असून 15 वर्षांच्या खंडानंतर कोलकात्यात प्रथमच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात मित्रत्वाचे आंतरराष्ट्रीय सामने होणार असून त्याच्या तयारीसाठी हे शिबिर घेण्यात येत आहे.
15 ऑगस्टला सर्व खेळाडू एकत्र आल्यानंतर 16 ऑगस्टपासून ट्रेनिंगला सुरुवात होणार असल्याचे एआयएफएफने सांगितले. यापूर्वी 2006 मध्ये फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील सौदी अरेबियाविरुद्धच्या लढतीआधी भारतीय संघाचे शिबिर कोलकात्यात घेण्यात आले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यात येणार असून बायो बबलमध्ये शिबिर आयोजित केले जाणार आहे. याशिवाय सर्व खेळाडू, प्रशिक्षक व साहायक स्टाफमधील सदस्यांची वरचेवर कोरोना चाचणीही घेतली जाणार आहे.
राष्ट्रीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 23 संभाव्य खेळाडूंची शिबिरासाठी निवड केली असून मालदिवमध्ये एएफसी चषक लढत होणार असल्याने एटीके मोहन बागान व बेंगळूर एफसी या दोन क्लब्समधील खेळाडूंची त्यात निवड करण्यात आलेली नाही. या लढती झाल्यानंतर दोन्ही क्लबचे खेळाडू शिबिरात ताबडतोब दाखल होणार आहेत. ‘या शिबिराच्या निमित्ताने खेळाडूंना पुन्हा भेटता आल्याने मी खुश आहे. आता पुढील आव्हानाची तयारी एकत्रित करता येणार आहे. दोन्ही क्लब संघांना माझ्या शुभेच्छा असून एएफसी चषक स्पर्धेतील लढतीत ते चांगले प्रदर्शन करतील, अशी मी आशा करतो,’ असे स्टिमॅक म्हणाले. पुढील आठवडय़ात शिबिर सुरू होणार असल्याने दाखल झालेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करावे लागेल. उर्वरित खेळाडू दाखल होईपर्यंत उपलब्ध असलेल्यांतूनच सर्वोत्तम खेळाडू निवडावे लागणार आहेत,’ असेही ते म्हणाले.
शिबिरात दाखल होणारे संभाव्य 23 खेळाडू ः गोलरक्षक-धीरज सिंग मोइरंगथेम, विशाल कैथ. डिफेंडर्स-आशिष राय, सेरिटन फर्नांडीस, आदिल खान, चिंगलेनसाना सिंग, नरेंदर, राहुल भेके, आकाश मिश्रा, मंदार राव देसाई. मिडफिल्डर्स-लालेंगमाविया, ग्लान मार्टिन्स, जीक्सन सिंग, अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडीस, सहल अब्दुल समद, हालिचरण नार्झरी, बिपिन सिंग, यासिर मोहम्मद. फॉरवर्ड्स-राहुल केपी, फारुख चौधरी, इशान पंडिता, रहीम अली.
एएफसी कप लढतीनंतर दाखल होणारे एटीके मोहन बागान व बेंगळूर एफसीचे खेळाडू ः गोलरक्षक-अमरिंदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू. डिफेंडर्स-प्रीतम कोटल, आशुतोष मेहता, संदेश झिंगन, सुभाषिश बोस. मिडफिल्डर्स-उदांता सिंग, प्रणय हलदर, सुरेश सिंग वांगजम, आशिक कुरुनियान. फॉरवर्ड्स-लिस्टन कुलासो, मनविर सिंग, सुनील छ़ेत्री.









