वृत्तसंस्था/ टॅम्पा, फ्लोरिडा
भारताचा मुष्टियोद्धा मनदीप जांगराने दुसरी व्यावसायिक लढत जिंकली असून येथे झालेल्या लढतीत त्याने स्थानिक बॉक्सर देव्हॉन लिरावर तांत्रिक नॉकआऊट विजय मिळविला.
गेल्या मार्चमध्ये त्याने व्यावसायिक मुष्टियुद्धात पदार्पण केले असून तो 2013 आशियाई चॅम्पियशिप आणि 2014 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यविजेता आहे. 27 वर्षीय मनदीपने 61 किलो लाईटवेट गटातील या चार फेऱयांच्या लढतीत दुसऱया फेरीतच तांत्रिक नॉकआऊट विजय मिळविला. ‘हौशी बॉक्सर असताना मी 69 किलो वजन गटात खेळत असे. पण आता या साचात फिट होण्यासाठी मी बरेचसे वजन कमी केले आहे. मात्र यावर मी खुश आहे,’ असे तो वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. ‘प्रो बॉक्स प्रमोशन्सच्या रूपात माझ्यासोबत मोठी संघटना असून मला पाठिंबा देणाऱया सर्व भारतीयांचा मी आभारी आहे. फक्त भारतातीलच नव्हे तर फ्लोरिडामध्ये वास्तव्यास असणाऱया भारतीयांचाही मी आभारी आहे,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या. यापूर्वी त्याने व्यावसायिक क्षेत्रातील पहिल्या लढतीत अर्जेन्टिनाच्या लुसियानो रॅमोसचा चार फेऱयांच्या लढतीत एकमताने पराभव केला होता.









