आमदार महादेवप्पा यादवाड यांची अधिकाऱयांना विविध सूचना
वार्ताहर/ रामदुर्ग
तब्बल दोन वर्षानंतर शनिवारी नगरपरिषदेच्या नूतन प्रशासन मंडळाची पहिली सामान्य सभा पार पडली. सभेत आमदार महादेवप्पा यादवाड, नगराध्यक्ष शंकरप्पा बेन्नूर, उपनगराध्यक्ष राघवेंद्र दोडमनी यांनी शहराच्या विकासाविषयी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी आमदार महादेवप्पा यादवाड म्हणाले, शहराच्या विकासासाठी आपल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये शासनाकडून 19.52 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याचा भरवसा त्यांनी दिला.
नगरपरिषदेमध्ये समाविष्ट केलेल्या भाग्यनगर व श्रीपतीनगरमधील नागरिकांसाठी वन विभागाच्या जागेमध्ये घरे बांधून अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, याचा ना हरकत दाखला आणि उतारा घेण्यात समस्या उद्भवत असून त्या दूर करण्यासाठी नगरपरिषदेच्या अधिकाऱयांनी प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही आमदार यादवाड यांनी केली.
नूतन सदस्यांनी वॉर्डमधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून जनतेबरोबर सौजन्याने वागावे. विकासकामात पक्षरहित कार्य द्यावे. तुरनूर ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे तेथील 9 एकर जागेमधील कचरा विल्हेवाट केंद्र स्थलांतरित करण्याचे काम हाती घेऊन त्या जागेमध्ये बेघरांसाठी घरकुल योजना राबविण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
नगरपरिषदेने दिलेल्या गाळय़ांचा व्यापारी दुरुपयोग करत असून त्या गाळय़ात पोटभाडेकरू ठेवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. याला उत्तर देताना मुख्याधिकारी एस. जी. अंबिगेर म्हणाले, ज्या गाळय़ांची मुदत संपली आहे ते गाळे नगरपरिषदेने ताब्यात घेतले आहेत. तसेच ज्या गाळय़ांमध्ये बदल करण्यात आले आहेत, त्या गाळेधारकांकडून त्याचा खर्चही वसूल करण्यात आला आहे, असे सांगितले. यावेळी स्थायी समितीच्या 11 सदस्यांची निवड करण्यात आली. सभेत अभियंता एम. एस. पाटील, एम. पी. नदाफ, समुदाय संघटनाधिकारी एम. एस. कौजलगी यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.









