पवमान होमसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर/ उगार खुर्द
येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमानमाला, पवमान होम व विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. हा कार्यक्रम 27 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कागवाड विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
शनिवार 19 रोजी 150 भाविकांना विजापूर येथील बसवलिंग स्वामीजींच्या हस्ते हनुमानमाला देण्यात आली. यावेळी बसवलिंग स्वामीजींनी मार्गदर्शन केले. 21 रोजी अमरेश्वर स्वामीजींचे प्रवचन होणार आहे. 22 व 23 रोजी सत्संग व बसवेश्वर स्वामीजींचे प्रवचन होणार आहे. 24 रोजी वैश्विक, 25 रोजी नागालिंग स्वामीजींचे प्रवचन, 26 रोजी सत्संग, 27 रोजी सकाळी 6 वाजता पवमान होम, 9 वाजता शोभायात्रा, हनुमानमाला विसर्जन, 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद बेळगावचे सचिव नारायण मठाधिकारी, उगार साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंदन शिरगावकर, विश्व हिंदू परिषद जिल्हा सचिव विठ्ठल माळी, विश्व हिंदू परिषद चिकोडी जिल्हा सचिव व्यंकटेश देशपांडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कागवाड तालुका अध्यक्ष रमेश योगी, तालुका कार्याध्यक्ष डॉ. अमोल सरडे, तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब नाईक-ढवळे, तालुका सचिव प्रवीण केंपवाडे, तालुका सहसचिव सुरेश बागडे, तालुका बजरंग दल संचालक विनायक खोतकांडे, तालुका गोरक्षक प्रमुख सौरभ कुलकर्णी, योगेश कुंभार, अनिल नावळगरे, लगमाण्णा अर्जुनवाडकर यांनी केले आहे.









