तालुक्यातील विविध शाळांना भेटी देणार : जांबोटी विद्यालयाच्या लोकार्पण सोहळय़ात सहभागी होणार, मान्यवरांची उपस्थिती

वार्ताहर / खानापूर
कर्नाटक राज्याचे उच्च शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांचा दि. 8 रोजी खानापूर तालुका दौरा होत आहे. त्यांचा हा खानापूर दौरा प्रथमच असून आज सकाळी ते तालुक्यातील विविध शाळांना भेट देणार आहेत. सकाळी 8 वा. कित्तूरमार्गे खानापूर तालुक्मयात त्यांचे आगमन होणार असून मंग्यानकोप येथील सरकारी प्राथमिक शाळेला भेट देणार आहेत. त्यानंतर बिडी सरकारी उच्च प्राथमिक शाळा, सकाळी 9 वा. संगोळ्ळी रायण्ण्णा सरकारी वस्ती शाळेला भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.30 वा. जांबोटी येथील मराठी प्राथमिक शाळेला त्यांची भेट होईल व त्याच ठिकाणी जांबोटी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळय़ामध्ये ते सहभागी होणार आहेत.
दुपारी 12.30 वा. सीमाभागातील सरकारी शाळांची समस्या या विषयासंदर्भात खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.30 वा. खानापूर सरकारी विश्रामधाममध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून समस्या ऐकणार आहेत. दुपारी 3 वा. खानापूर येथील सरकारी आमदार कन्नड शाळेला त्यांची भेट होईल, त्यानंतर दुपारी 3.15 वा. नंदगड जॉईंट सेंट्रल शाळेला भेट देणार आहेत. त्यानंतर नंदगड येथील संगाळ्ळी रायण्णा समाधीला भेट देणार आहेत.
जांबोटी हायस्कूलच्या नूतन इमारतीचे आज लोकार्पण
जांबोटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानातून बांधलेल्या जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा सोमवार दि. 8 रोजी सकाळी 11.30 वा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रमुख मंगेशजी भेंडे नागपूर, बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे उपकुलपती प्रा. करीसिद्धाप्पा यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कर्नाटक प्रांत प्रमुख राघवेंद्रजी कागवाड यांनी दिली.
दरम्यान जांबोटीसारख्या दुर्गम व मागास भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. जनकल्याण ट्रस्ट बेळगाव या संस्थेच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींकडून आपत्ती निवारण निधी संकलन करून तसेच विद्या विकास समितीची स्थापना करून माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून 65 लाख रुपये खर्च करून सर्व सोयीनियुक्त शालेय इमारतीची निर्मिती करण्यात आल्यामुळे जांबोटी परिसरातील नागरिकांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.









