मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी आमदार जी. एल. अष्टेकर यांचा स्मृतिदिन
वार्ताहर / सांबरा
माजी आमदार कै. जी. एल. अष्टेकर यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य फार मोठे आहे. ते एक निष्कलंक राजकारणी होते. गावामध्ये शाळा उभारण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. शाळेची इमारत लवकर पूर्ण क्हावी, यासाठी त्यांनी देणग्या जमा केल्या. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या वाटेवरून चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्योती कॉलेजचे माजी प्राचार्य ए. ए. घोरपडे यांनी केले. ते रविवार दि. 7 रोजी मुतगे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित माजी आमदार कै. जी. एल. अष्टेकर यांच्या सोळाव्या स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक वाय. बी. संभाजीचे होते.
यावेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील म्हणाले की, गावातील मुला-मुलींना गावातच शिक्षण घेता यावे, यासाठी कै. जी. एल. अष्टेकर यांनी शाळेची उभारणी केली. आज शाळेने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. शाळेत शिकलेली मुले आज वेगवेगळय़ा क्षेत्रात कार्यरत असून गावचे नाव उज्ज्वल करत आहेत. यापुढील काळातही शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवून मुलांना योग्य शिक्षण देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर म्हणाले की, आबाजींचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सहकार व क्रीडा क्षेत्रातील कार्य फार मोठे आहे. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मराठा बँकेच्या चेअरमनपदाची धुराही व्यवस्थितरीत्या सांभाळली होती. गावात अनेक संघ-संस्था स्थापून गावात विकासाची गंगा
आणली. वाय. बी. संभाजीचे म्हणाले की, माजी आमदार कै. जी. एल. अष्टेकर यांना गावात सर्वजण आदराने ‘आबाजी’ म्हणून ओळखत असत. गावातील कोणतेही भांडण-तंटे असोत ते मिटवत असत. त्यांनी भेदभावाला कधी थारा दिला नाही. ते एक उत्कृष्ट कब्बड्डीपटूही होते. त्यांनी गावच्या विकासाबरोबरच धार्मिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य फार मोठे आहे.
प्रारंभी मुख्याध्यापक एम. वाय. केदार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक पी. यु. कॉलेजचे प्राचार्य डी. एम. शितोळे यांनी केले. ग्रा. पं. अध्यक्ष भालचंद्र पाटील व शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी कै. जी. एल. अष्टेकर यांच्या फोटोचे पूजन केले. त्यानंतर विविध संघ-संस्थांच्या पदाधिकाऱयांनी व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमास ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, ता. पं. माजी सदस्य शामराव पाटील, बाळाराम पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एन. डी. बंडाचे, एस. एन. जाधव, ग्रा. पं. सदस्य किरण पाटील, प्रभाकर पाटील, शाम मुतगेकर, सुधीर पाटील, सदस्या बबिता पाटील, भाग्यश्री पाटील, लक्ष्मी पाटील, स्नेहल पुजारी, भावकेश्वरी को-ऑप. पेडिट सोसायटीचे सेपेटरी भाऊराव जाधव, हेमंत पाटील, मनोहर कडेमनी, महेश पाटील, समीर पाटील, शिरीष पाटील, नारायण कणबरकर, न्यू इंग्लिश प्राथमिक स्कूलचे मुख्याध्यापक एस. आर. तिरवीर, दत्ता पाटील, अशोक पाटीलसह विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पी. वाय. पाटील यांनी केले. आभार तुकाराम कुराडे यांनी मानले.









