110 सदस्यांच्या खडपे कुटुंबाचा आणखी एक पायंडा
वार्ताहर / राजापूर
राजापूर शहरातील अक्षता खडपे या मुलीने पित्याचे अंत्यसंस्कार करत एक नवा पायंडा पडला आहे. मुलीने वडिलांवर अंत्यसंस्कार केल्याच्या घटना दुर्मीळ आहेत. अक्षता यांनी परंपरेला छेद देत एक वेगळा पायंडा रचला असून या निर्णयाचे कौतुक होत आहे.
राजापूर शहरातील खड़पेवाडी येथील खडपे कुटुंबीय विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कै. संजय खडपे, सुधीर खडपे, उल्हास खडपे, राजन खडपे, दिपक खडपे आपल्या विविधांगी कार्यातील योगदानासाठी परिचित आहेत. विशेष म्हणजे सर्व खडपे कुटुंबीय एकत्र कुटुब पध्दतीने राहतात. या घरात तब्बल 110 सदस्य आहेत. त्याचे मुंबईस्थित सख्खे चुलत बंधू अजय खडपे यांचे नुकतेच राजापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अजय खडपे यांना तीन मुली आहेत. काकांच्या मृत्युनंतर आठ पुतणे काकाचे कार्य करण्यास तयार झाले. पण कै. अजय यांची मोठी मुलगी अक्षता हिने स्वतः पित्याचे अंत्यसंस्कार करण्याचा हट्ट धरला.
अक्षता मुंबईमध्ये प्रसिध्द कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. सात चुलते आणि नऊ पुतणे असताना अत्यंसंस्कार एका मुलीने करावे याबद्दल कुटुंबातील सदस्यांनी ळकत्रपणे चर्चा केली. शेवटी अक्षताने अंत्यसंस्कार करावे असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सुमारे पंधरा वर्षापुर्वी एका अपघातात अजय खडपे अपंग झाले होते. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अक्षतावर येवून पडली. श्रातःचे शिक्षण आणि आपल्या दोन बहिणींची सर्व जबाबदारी तिने मोठय़ा हिमतीने पार पडली. तिच्या दोन्ही बहिणी उच्च शिक्षीत आहेत. अक्षता खडपे आणि तिच्या कुटुंबियांनी मुलीला अंत्यसंस्कारासाठी परवानगी देऊन एकप्रकारे सामाजिक स्तरावर धाडस दाखविले. मुलीने पित्यावर अंत्यसंस्कार करून समाज प्रबोधनाचेही काम या कुटुंबाने केले आहे. या निर्णयाबद्दल परिसरातूनही सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.








