इस्रायल अन् पॅलेस्टिनींमध्ये संघर्ष – शेख जर्राहवरून वाद
वृत्तसंस्था / जेरूसलेम
पूर्व जेरूसलेम शहरात रविवार रात्रीपासूनच इस्रायलचे सुरक्षा दल आणि पॅलेस्टिनींमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. इस्रायली अधिकाऱयांनी यादरम्यान अश्रूधूराचा वापर करत ‘स्टन ग्रेनेड’ही डागले आहेत. तर पॅलेस्टिनी निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. अल अक्सा मशीद परिसराच्या जवळूनच दगडफेक करण्यात आल्याचे इस्रायलच्या पोलिसांनी सांगितले आहे. तर रमजानच्या या पवित्र महिन्यात मशीद परिसरात स्टन ग्रेनेड डागण्यात आल्यो 70 हून अधिक जण जखमी झाल्याचा दावा पॅलेस्टिनींनी केला आहे.
वादग्रस्त भागावर इस्रायलचा हक्क दर्शविण्यासाठी तेथील जहाल संघटनांनी ओल्ड सिटीमधून परेड काढण्याच्या एक दिवसापूर्वी हा संघर्ष झाला आहे. रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या या संघर्षानंतर सोमवारी वार्षिक ‘जेरूसलेम दिवस’ समारंभात हिंसा होण्याची भीती वाढली आहे. इस्रायलच्या पोलिसांनी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तणावानंतरही परेड काढण्याची अनुमती दिली होती. कुठल्याही कट्टरतावादी शक्तीला जेरूसलेममधील शांतता प्रभावित करू देणार नाही. आम्ही निर्णायक स्वरुपाने तसेच जबाबदारीपूर्वक कायदा-सुव्यवस्था लागू करणार आहोत. सर्व धर्मांच्या लोकांच्या पूजा-प्रार्थनचे स्वातंत्र्य कायम ठेवू असे उद्गार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी काढले आहेत.
जेरूसलेम दिनावरून तणाव
अमेरिकेने जेरूसलेममधील स्थितीसंबंधी ‘गंभीर चिंता’ व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी इस्रायलच्या एनएसएसोबत फोनवरून चर्चा केली आहे. जेरूसलेम दिनाच्या स्मरणोत्सवादरम्यान शांतता राखण्याचे आवाहन अमेरिकेने इस्रायलला केले आहे. 1967 मध्ये पूर्व जेरूसलेमवर इस्रायलने मिळविलेल्या नियंत्रणाप्रित्यर्थ जेरूसलेम दिन साजरा करण्यात येतो. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांचाही पूर्व जेरूसलेमवर दावा आहे.
न्यायालयीन निर्णयाची पार्श्वभूमी
इस्रायलच्या न्यायालयाने पूर्व जेरूसलेम येथे राहत असलेल्या 4 पॅलेस्टिनी कुटुंबांना शेख जर्राह भागातून बाहेर काढण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने या सर्व ठिकाणांवर इस्रायली लोकांना वसविण्याचा आदेश दिला आहे. याबाबत आता तेथील सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने इस्रायली लोकांच्या बाजूने निर्णय दिल्यास पॅलेस्टिनी लोकांना स्वतःचे घर सोडावे लागणार आहे. या तणावादरम्यान शहरातील इसायलच्या पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे. पॅलेस्टिनी लोकांनी याला स्वतःच्या अधिकारांचे उल्लंघन मानले आहे.
दोन्ही धर्मांसाठी महत्त्वपूर्ण
ज्यू आणि मुस्लीम दोघांसाठी शेख जर्राह भाग धार्मिक दृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे. याचमुळे ज्यू या भागात पोहोचल्यास त्यांचा तेथे राहत असलेल्या मुस्लिमांसोबतचा तणाव वाढतो. याच भागात जर्राही का मकबरा आहे. शेख जर्राह भाग जेरूसलेमच्या उत्तर हिस्स्यात आहे. याच्यानजीक हिब्रू विद्यापीठ देखील आहे.









