कोरोना प्रकोपामुळे भक्त गंगास्नानापासून वंचित
शहर वार्ताहर/ राजापूर
देशभरात दुसऱया लाटेचा कोराना विषाणूचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे गुरूवारी सकाळी आगमन झाले. गतवर्षीही एप्रिल महिन्यात गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर वर्ष होताच गंगामाई पुन्हा प्रकटली आहे. गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले असून काशीकुंड तुडूंब भरल्याने गोमुखातून पाण्याचा अखंड स्रोत सुरू झाला आहे.
सर्वसाधारणपणे दर 3 वर्षांनी गंगा प्रकट होते व सुमारे 3 महिन्याच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते, असा प्रघात आहे. मात्र अलिकडे तिच्या या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे ती सलग प्रगट झाली होती. काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही लांबला होता. यावेळी 1 वर्ष 14 दिवसांनी गंगामाईचे पुनरागमन झाले आहे. गुरूवारी सकाळी ग्रामस्थ गंगाक्षेत्री गेले असता गंगेचे आगमन झाल्याचे त्यांनी पाहिले. गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने पूर्ण भरली होती. सर्वात मोठे असणारे काशिकुंड पूर्ण भरल्याने गोमुखातून पाणी वाहत होते. मुळ गंगेचा प्रवाह मोठय़ा स्वरूपात वाहत होता.
तीन वर्षानी अवतरणाऱया गंगेच्या गेल्या काही वर्षात आगमन-निर्गमनाच्या वेळेत आमूलाग्र बदल झाला आहे. यापूर्वी 10 फेब्रुवारी 2011 रोजी गंगामाईचे आगमन तर 5 जून 2011 रोजी निर्गमन झाले होते. त्यानंतर जेमतेम 10 महिन्यांनंतर 11 एप्रिल 2012 रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर 23 मार्च 2013 रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. यावेळी जवळपास सप्टेंबर 2014 पर्यंत गंगामाई प्रवाहित होती. गंगामाईचे निर्गमन होऊन 7 ते 8 महिन्याचा कालावधी लोटला असतानाच पुन्हा 27 जुलै 2015 रोजी गंगामाईचे आगमन व 16 फेब्रुवारी 2016 रोजी निर्गमन झाले होते. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच म्हणजे 31 ऑगस्ट 2016 रोजी भरपावसात पुन्हा गंगामाई प्रकट झाली होती. त्यानंतर 7 मे 2017 रोजी आगमन झाले व ती 19 जून रोजी अंतर्धान पावली होती आणि त्याचवर्षी 6 डिसेंबर 2017 ला आगमन झाले तर 20 मार्च 2018 रोजी अंतर्धान पावली होती. त्यानंतर पुन्हा 7 जुलै 2018 रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. यावेळी 133 दिवसांनी नोव्हेंबर महिन्यात गंगामाई अंतर्धान पावली होती.
दरवर्षी आगमनाचे तिसरे वर्ष
25 एप्रिल 1919 ला व गतवर्षी 15 एप्रिल 2020 मध्ये आणि त्यानंतर 1 वर्ष 14 दिवसांनी पुन्हा गंगामाईचे आगमन झाले आहे. वर्षभराने गंगामाईचे आगमन झाल्याने गंगाभक्तांना सुखद धक्का बसला आहे. सद्यस्थितीत मुळ गंगेसह चंद्रकुंड, सूर्यकुंड, नर्मदाकुंड, गोदावरी कुंड, चंद्रभागा कुंड, बाणकुंड, सरस्वती कुंड, कावेरीकुंड, भिमाकुंड पाण्याने भरली असून काशीकुंडातील पाणी गोमुखातून वाहण्यास सुरूवात झाली आहे. सध्या देशभर कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना गंगामाईचे आगमन झाल्याने भक्तांना पवित्र स्नानापासून वंचित रहावे लागणार आहे.









