आयपीएल साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला 23 धावांनी नमवले
नवी मुंबई / वृत्तसंस्था
जोस बटलरचे 68 चेंडूतील तडाखेबंद शतक आणि फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱयाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला 23 धावांनी धूळ चारली. या लढतीत राजस्थानने निर्धारित 20 षटकात 8 बाद 193 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात मुंबईला 20 षटकात 8 बाद 170 धावांवर समाधान मानावे लागले.
बटलरने आयपीएल क्रिकेटमधील आपले दुसरे शतक अवघ्या 66 चेंडूत साजरे केले. नंतर तो 68 चेंडूत 100 धावांवर बाद झाला. मुंबईतर्फे जसप्रित बुमराहने 17 धावात 3 बळी घेतले असले तरी बटलरच्या फटकेबाजीमुळे राजस्थानला सहजपणे 200 धावांच्या उंबरठय़ावर पोहोचता आले. शिमरॉन हेतमेयरने 14 चेंडूत 35 तर संजू सॅमसनने 21 चेंडूत 30 धावांचे झटपट योगदान दिले.
विजयासाठी 194 धावांचे आव्हान असताना इशान किशन (43 चेंडूत 54) व नवोदित एन. तिलक वर्मा (33 चेंडूत 61) यांनी 8 षटकात 81 धावांची आतषबाजी केली. मात्र, 14 ते 16 व्या षटकादरम्यान अश्विन (4 षटकात 1-30) व चहल (4 षटकात 2-26) यांनी हा सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. एकीकडे, राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 2 पैकी 2 सामने जिंकले तर दुसरीकडे, मुंबईसाठी हा सलग दुसरा पराभव ठरला.
14 ते 16 व्या षटकादरम्यान अश्विन व चहल यांनी एकत्रित फक्त 16 धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या 4 षटकातही ट्रेंट बोल्ट (1-29), प्रसिद्ध कृष्णा (1-37), नवदीप सैनी (2-36) यांनी केरॉन पोलार्डसारख्या (24 चेंडूत 22) विस्फोटक फलंदाजाला जखडून ठेवण्यात यश मिळवले. पोलार्डला फास्ट वाईड यॉर्कर ताकदीने खेळता येत नाही, हे ताडत या गोलंदाजांनी त्या दिशेने आपली रणनीती अंमलात आणली. तिलक वर्माला सूर सापडला, ही मुंबई इंडियन्ससाठी एकमेव जमेची बाजू ठरली.
तत्पूर्वी, जोस बटलरने 68 चेंडूत 11 चौकार, 5 षटकारांसह 100 धावांची आतषबाजी केली तर हेतमेयरने 14 चेंडूत जलद 35 धावा फटकावल्या. सॅमसनने 21 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. बटलरने थम्पीच्या एकाच षटकात 3 षटकार व 2 चौकारांसह 26 धावांची आतषबाजी केली. मुंबईतर्फे बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 17 धावात 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 8 बाद 193 (जोस बटलर 68 चेंडूत 11 चौकार, 5 षटकारांसह 100, शिमरॉन हेतमेयर 14 चेंडूत 35, संजू सॅमसन 21 चेंडूत 30. अवांतर 11. जसप्रित बुमराह 3-17, तिमल मिल्स 3-35, केरॉन पोलार्ड 1-46).
मुंबई इंडियन्स ः 20 षटकात 8 बाद 170 (तिलक वर्मा 33 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांसह 61, इशान किशन 43 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 54, केरॉन पोलार्ड 24 चेंडूत 22, अवांतर 11. नवदीप सैनी, यजुवेंद्र चहल प्रत्येकी 2 बळी, बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, अश्विन प्रत्येकी 1 बळी).









