पक्षाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण
वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय जनता दलाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पक्षाकडून रजत जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दीर्घकाळानंतर लालूप्रसाद यादव यांनी सोमवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे लालू यादव यांनी दिल्लीमधून व्हर्च्युअल माध्यमातून पाटण्यात होत असलेल्या समारंभाला संबोधित पेले. राजदचे भविष्य उज्ज्वल असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे
राजद कार्यकर्त्यांना संबोधित करताना लालूंनी मंडल आंदोलनाचा उल्लेख केला आहे. समाजाच्या वंचित लोकांना पहिल्यांदा आमचे सरकार असताना बूथपर्यंत जाण्याची संधी मिळाली. कर्पूरी ठाकूर यांची स्वप्ने आम्ही पूर्ण केली, पूर्ण करत आहोत आणि संघर्ष करत आहोत असे लालू यादव म्हणाले.
मी 5 पंतप्रधानांना जवळून पाहिले आहेत, अनेकांना पंतप्रधान होण्यास मदत केली आहे. केंद्रीय मंत्रिपद दिले नसताना मी काहीच बोललो नाही, पण नितीश कुमार व्याकुळ असल्याने त्यांना कृषिमंत्रिपद मिळवून दिले होते असा दावा लालूंनी यावेळी केला आहे.
देश आज आर्थिक संकटाला तोंड देत आहे. याचबरोबर सामाजिक सलोखा संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अयोध्येनंतर मथुरेचा नारा दिला जातोय. सत्तेसाठी देश तोडला जात आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी राजद कार्यकर्त्यांनी काम करावे. कोरोनासोबत महागाई, बेरोजगारीने लोकांचे कंबरडे मोडून काढले आहेत. विमान कंपनी आणि रेल्वे विक्रीत काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
माझ्या शासनकाळाला जंगलराज म्हटले जात होते. परंतु ते खऱया अर्थाने गरीबांचे राज्य होते. नितीश सरकारच्या काळात आज बिहारमध्ये दररोज 3-4 हत्या होत आहेत, भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. आमचा बिहार खूपच मागे पडला आहे. लाखो लोक स्थलांतरित मजूर असल्याचे विधान लालूंनी केले आहे.
बिहारचा दौरा करणार
स्वतःच्या प्रकृतीचा दाखला देत लालूप्रसाद यांनी सध्या पाटण्यात नाही, पण लवकरच पाटणाच नव्हे तर बिहारच्या सर्व जिल्हय़ांचा दौरा करणार असल्याचे म्हटले आहे. तेजस्वी आणि तेजप्रतापद बिहारमध्ये पक्षाला पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लालूंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.









