सोनिया अन् प्रियांका यांच्याकडून प्रयत्न सुरू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसमध्ये लवकरच काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. पक्षाला लोकसभेत नवा नेता मिळणार असल्याचेही मानले जात आहे. राहुल गांधी यांचे नाव लोकसभेतील पक्षनेतेपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याची चर्चा आहे. यासंबंधी राहुल गांधी यांनाच अंतिम निर्णय घ्यायचा असल्याने काँग्रेसचे नेते याबद्दल बोलणे टाळत आहेत.
पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियंका वड्रा यांच्याकडून राहुल गांधी यांनी हे पद स्वीकारावे यासाठी पूर्ण प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेतील पक्षनेतेपद स्वीकारल्यास काँग्रेस अध्यक्ष म्हणून पक्षातील अन्य नेत्याची वर्णी लागू शकते. सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमध्ये बदल घडवून आणण्याची 23 नेत्यांची मागणी देखील अशा निर्णयामुळे पूर्ण होणार आहे. काँग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल आताच निर्णय घेतला जाणार नाही, कारण विद्यमान अखिल भारतीय काँग्रेस समितीचा कार्यकाळ 2022 पर्यंत आहे.
सद्यकाळात लोकसभेत काँग्रेसचे गटनेते म्हणून अधीर रंजन चौधरी कार्यरत आहेत. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी काँग्रेसला अधीर रंजन चौधरी यांना या पदावरून दूर करावे लागणार असल्याचा अनुमान आहे. चौधरी हे ममता बॅनर्जी यांचे तीव्र विरोधक मानले जातात. तर राहुल गांधी हे भाजपचे सातत्याने लक्ष्य ठरले आहेत. संसदीय समितीच्या बैठकांमध्ये हजर न राहिल्याप्रकरणी राहुल गांधी यापूर्वीचे टीकेचे धनी ठरले आहेत.
लोकसभेत पक्षाचे कामकाज योग्यप्रकारे न चालविण्याचा आरोप अधीर यांच्यावर आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला विधानसभा निवडणुकीत भोपळाही फेडता आला नव्हता.









