आमदार नीतेश राणे यांचा सवाल : सखोल चौकशी व्हायला हवी!
प्रतिनिधी / :कणकवली
ज्या दिवशी सचिन वाझेला अटक झाली, त्यादिवशी सकाळी वाझेची काळय़ा रंगाची मर्सिडिज गाडी भांडुपला संजय राऊत यांच्या आमदार भावाच्या ऑफिसबाहेर काय करीत होती? 2014-19 या कालावधीत वाझेला परत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह करीत होते. त्यामुळे याचा बॉस कोण, त्याला कुणाचा राजकीय आशीर्वाद आहे, हे स्पष्ट होते, असे आमदार नीतेश राणे म्हणाले.
याबाबत राणे म्हणाले, आम्ही थेट नाव घेऊनच आरोप केलेले आहेत. खासदार संजय राऊत ‘हमाममें नंगे’ असतील, आम्ही नाही. आमचा हमाम वेगळा आहे. जनतेशी आमची बांधिलकी आणि प्रामाणिकपणा आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांना नाव घेऊन आरोप करण्याचा सल्ला देणाऱया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे आणि आयपीएल बुकीसंदर्भात वरुण सरदेसाई कनेक्शन असल्याचे मी नावानिशी सांगितले आहे, हे जाणून घ्यावे. परमवीर व वाझे यांच्या मदतीसाठी कोण दबाव टाकत होते, ते पाहवे. त्याबाबतची पण चौकशी झाली पाहिजे. त्यांची बदली होते. मग यांनीही राजीनामा द्यायला हवा. यांचे काय संबंध आहेत, ते तपासले पाहिजेत, असे राणे म्हणाले.









