जि. प. स्थायी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या अभिनंदावरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी
पडतेंना रुग्णालयात हलविले उपचाराअंती घरी पाठवले
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
पालकमंत्री उदय सामंत यांनी 11 रुग्णवाहिका मंजूर केल्यामुळे त्यांच्या अभिनंदनाच्या मांडलेल्या ठरावाला सत्ताधारी सदस्यांनी विरोध केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी आक्रमक झालेले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर सभाही आटोपती घेण्यात आली.
जि. प. स्थायी समितीची सभा जि. प. अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सत्ताधारी भाजपचे गटनेते रणजित देसाई, शिवसेना सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, संजना सावंत, विष्णूदास कुबल, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, खातेप्रमुख आदी उपस्थित होते.
आमदार नीतेश राणे यांची कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव रणजित देसाई यांनी सभेच्या सुरुवातीलाच मांडला. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी खनिकर्म निधीतून जिल्हय़ात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 11 रुग्णवाहिका मंजूर केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
पडते यांनी पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतात गटनेते देसाई यांनी या ठरवाला विरोध केला. यावरून पडते व देसाई यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. पालकमंत्र्यांनी रुग्णवाहिका मंजूर केल्या असतील, तर लेखी मंजुरी किंवा झालेला निर्णय दाखवा, असे देसाई यांनी सांगीतले. गेली दोन-तीन वर्षे रुग्णवाहिकांचा विषय सुरू आहे. मंजुरीचे आदेश अजूनही नाहीत. त्यामुळे अभिनंदनाचा ठराव घेता येणार नाही, असे देसाई म्हणाले. तर आमदार नीतेश राणे यांच्या कोकण विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवडीचेही लेखी आदेश दाखवा, असे संजय पडते म्हणाले. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी झाली. अध्यक्ष म्हापसेकर यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ही खडाजंगी झाल्यानंतर दोघेही शांत झाले. परंतु तोपर्यंत आक्रमक झालेल्या संजय पडते यांचा ब्लड प्रेशर वाढला आणि त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे ते सभागृहाबाहेर पडले. त्यामुळे सभागृहात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सगळय़ांची धावपळ उडाली. पडते यांचा रक्तदाब वाढल्याने देसाई यांच्यासह सर्वच सदस्य सभागृह सोडत पडते यांच्यासोबत गेले.
पडते यांच्यावर जि. प. मध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोबत रणजित देसाई, संजना सावंत, अमरसेन सावंत होते. त्यानंतर अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी स्थायी समिती सभा आटोपती घेत त्यांनीही रुग्णालयात पडतेंची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, पडते यांना उपचाराअंती घरी पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जि. प. कडून देण्यात आली.









