वार्ताहर/ पाली
रस्ते सुरक्षा ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक चालकाने वाहन चालवताना आपल्या जीवनशैलीचाच भाग करुन अंगिकारली तर निश्चितच शुन्य अपघाताचे ध्येय साध्य करणे अशक्य होणार नाही. वाहनचालकांनी महामार्गावर वाहन चालवताना दक्षता घेऊन वाहने चालवल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होते, हे मागील काही वर्षात आढळून आले आहे, असे प्रतिपादन महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी केले.
32 व्या रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबा येथे पार पडले. यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, सडक सुरक्षा-जीवन रक्षा हे यावर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य असून यंदा पहिल्यादांच 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या महिना भरासाठी सुरु राहणार आहे. तसेच महामार्गावरुन प्रवास करणाऱया चालकांना हॅल्मेट, सिटबेल्ट वापरण्यासंदर्भात वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करण्याबाबतीत जनजागृती करण्यात येणार आहे.
तसेच महामार्गावरील पेट्रोलपंप, हॉटेल, धाबे येथे रस्ता सुरक्षिततेसंदर्भातील माहितीफलक लावण्यात येणार आहे. तसेच सध्या महामार्गाचे चौपदरीकरण सुरु असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व खासगी कंत्राटदार यांच्या सहकार्याने महामार्गावर क्याटआय, रेलिंग, वळण रस्त्यांची दुरुस्ती व सूचनाफलक या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच मोठय़ा चारचाकी वाहनांना रिफ्लेक्टर पट्टी लावण्यात येणार आहे. तसेच वाहनचालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक भंडारे तसेच हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष सावंत, मुरलीधर नाटेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल भार्गव घाग, बाजीराव निरटे, संजय मुरकर, सचिन घाग, प्रकाश सुर्वे, नाना सावंत, विजय गमरे उपस्थित होते.









