चोख प्रत्युत्तर देणार असल्याची रशियाची धमकी
युक्रेनच्या बूचामध्ये रशियन सैन्याकडून झालेल्या नरसंहारानंतर युरोपीय महासंघाचे सदस्य देश संतप्त झाले आहेत. मागील 48 तासांमध्ये अनेक देशांनी 120 हून अधिक रशियन मुत्सद्यांची हकालपट्टी केली आहे. यातील बहुतांश मुत्सद्यांवर हेरगिरी करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कारवाई करणाऱया देशांमध्ये इटली, स्पेन, डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी आणि फ्रान्सचा प्रामुख्याने समावेश आहे.
युरोपीय महासंघाने रशियाच्या विरोधात नव्या निर्बंधांची घोषणा करत 3 अब्जाहून अधिक मूल्याच्या कोळशाच्या आयातीवर बंदी घातली आहे. परंतु जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या विरोधामुळे रशियाचे कच्चे तेल आणि वायू पुरवठय़ावर निर्बंधांची घोषणा करणे टाळण्यात आले आहे.
इटलीने मंगळवारी रशियाच्या आणखीन 15 मुत्सद्यांना देशातून बाहेर काढले आहे. फ्रान्सने सोमवारी 25 रशियन मुत्सद्यांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. त्याच दिवशी जर्मनीनेही रशियाच्या 40 मुत्सद्यांना देशाबाहेर काढले हेते. रशियाने याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करत चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारच्या निर्णयामुळे युरोपीय देशांसोबतचे संबंध अधिक गुंतागुंतीचे होतील असे रशियाकडून नमूद करण्यात आले आहे.
युरोपीय देशांच्या या निर्णयाकडे आम्ही नकारात्मक स्वरुपात पाहतो. अशा अवघड स्थितीत राजनयिक संवादाचे माध्यम मर्यादित केले जातेय याचे आम्हाला दुःख आहे. या निर्णयामुळे संवादाची प्रक्रिया गुंतागुंतीची ठरणार असल्याचे रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या बूचामध्ये रस्त्यांवर मृतदेह सापडल्यावर युरोपीय देशांवर रशियाच्या विरोधात कारवाईसाठी दबाव वाढत आहे.









