लंडन / वृत्तसंस्था
दिएगो माराडोनाने 1986 वर्ल्डकपमध्ये सर्वात वादग्रस्त असा ‘हँड ऑफ गॉड’ गोल नोंदवला, त्यावेळी त्याने परिधान केलेल्या टी-शर्टचा लवकरच ऑनलाईन लिलाव होणार आहे. दि. 20 एप्रिल रोजी या लिलावाचा पहिला टप्पा सुरु होणे अपेक्षित आहे.
सॉकर इतिहासातील सर्वोत्तम म्हणता येईल किंवा सर्वात खराब, पण, माराडोनाचा तो ‘हँड ऑफ गॉड’ गोल फुटबॉल वर्तुळात नेहमी केंद्रस्थानी राहिला आहे. त्या सामन्यातील जर्सीला किमान 4 दशलक्ष पौंडपेक्षा अधिक किंमत लाभेल, असा अंदाज आहे. सध्या ही जर्सी मँचेस्टरमधील इंग्लंडच्या नॅशनल फुटबॉल म्युझियममध्ये लोनवर संग्रहित आहे.
स्ट्रीटवियर व मॉडर्न कलेक्टिबल्सचे सोथबी हेड ब्रॅहम वॅटचर यांनी सदर लिलावाची माहिती देताना लिलावानंतर हा शर्ट पुन्हा आपल्याला हाताळता येणार नाही, याची आपल्याला कल्पना असल्याचे येथे नमूद केले. दि. 22 जून 1986 रोजी मेक्सिको शहरात झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत माराडोनाने 2 गोल केले. ब्रिटन व अर्जेन्टिना यांच्यातील युद्धानंतर चारच वर्षांनी ही लढत झाली होती.
माराडोनाने या सामन्यातील पहिला गोल हेडरवर नोंदवला गेल्याचा पंचांनी निवाडा दिला. मात्र, प्रत्यक्षात त्यावेळी चेंडू माराडोनाच्या हाताला स्पर्शून गेला आणि ही बाब पंचांच्या नजरेतून सुटली होती. त्यानंतर माराडोनाने ड्रिबलचा उत्तम नमुना प्रत्यक्षात साकारुन देत दुसरा गोल नोंदवला आणि गोलरक्षक पीटर शिल्टॉनसह अवघा इंग्लिश संघ स्तंभित राहिला होता. त्यानंतर 2002 मध्ये फिफाच्या पोलमध्ये ‘गोल ऑफ द सेंच्युरी’ म्हणून नोंद झाली.
पुढे, अर्जेन्टिनाने तो सामना 2-1 फरकाने जिंकत आगेकूच केली आणि नंतर फिफा विश्वचषकावर देखील आपली मोहोर उमटवली. कोकेन, प्रकृती अस्वास्थ, विविध वादंगामुळे देखील प्रकाशझोतात राहिलेल्या माराडोनाचे नोव्हेंबर 2020 मध्ये वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. त्यांची ‘हँड ऑफ गॉड’ फेम जर्सी प्रत्यक्ष लिलावापूर्वी सोथेबी यांच्या लंडन शोरुममध्ये प्रदर्शनार्थ ठेवली जाणार आहे.









