खासगी डॉक्टरकडून स्वीकारली ७ हजाराची लाच, भरणेच्या माजी सरपंचाचाही समावेश, अवघ्या महिन्यातच जिल्ह्यात सापडला लाचखोर प्रशासक
खेड/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने दवाखान्यास बजावलेली कारवाईची नोटीस रद्द करण्यासाठी ७ हजार रूपयांची लाच स्वीकारणारा येथील पंचायत समितीचा विस्तार अधिकारी व भरणे ग्रामपंचायतीच्या प्रशासक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वेरळनजीकच्या एका हॉटेललगत हा प्रकार घडला असून भरणे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाचाही समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीनंतर अवघ्या महिन्याभरातच लाचखोर प्रशासक जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भरणे येथे देवानंद रामलाल मासरकर (५२, रा. भरणे) या लाचखोर प्रशासकासह सुनील सिताराम चिले (४०, रा. भरणे-घडशीवाडी) असे माजी सरपंचाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा भरणे येथे खासगी दवाखाना आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने वैद्यकीय व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करून सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची तोंडी तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी दवाखान्यास नोटीस बजावून याबाबतचा खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्याची तंबी लाचखोर प्रशासकाने तक्रारदारास दिली होती.
नोटीसीनुसार कारवाई न करण्यासाठी लाचखोर प्रशासकाने तक्रारदाराकडे २० हजार रूपयांची लाच मागतली होती. त्यातील १० हजार रूपये स्वीकारत उर्वरित १० हजार रूपये न दिल्यास पुढील कारवाई अटळ असल्याचे तक्रारीदारास सांगितले. याबाबत खासगी डॉक्टरने २८ रोजी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. १० हजार रूपयांच्या रक्कमेऐवजी तडजोडीनंतर ७ हजाराची मागणी केली. स्वत: साठी ५ हजार तर सुनील चिले याच्यासाठी २ हजार रूपये असे ७ हजाराची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकायांनी रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नितीन विजयकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, पोलीस नाईक विशाल नलावडे, योगेश हुंबरे, पोलीस शिपाई हेमंत पवार यांनी केली. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतीचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. तालुक्यात ८७ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे. अवघ्या महिनाभरातच जिल्ह्यातील पहिला लाचखोर प्रशासक खेडमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.









