प्रतिनिधी / खेड
शहरातील डाकबंगला परिसरातील 6 फ्लॅट फोडून 47 हजाराचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही. या घरफोड्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी गस्तीत वाढ केली आहे. नागरिकांनाही सतर्प राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
शहरातील डाकबंगला येथील अलमका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या फरहा परकार यांचा फ्लॅट फोडून कपाटातील 15 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. याच अपार्टमेंटमधील मुमताज बेगम महंमद खान, नुरे, फर्जन खोत यांचेही फ्लॅट फोडले. मात्र याठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. याच अपार्टमेंटनजीक असलेल्या अमान रेसिडेंसीमधील समीर ईस्माइल कोंडविलकर यांचाही फ्लॅट फोडण्यात आला. याच अपार्टमेंटमधील मुस्तफा सरगुरो यांचा फ्लॅट फोडून 32 हजाराची रोकड लांबवली.
एकाच रात्री 6 फ्लॅट फोडत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्प झाली आहे. अपार्टमेंटमध्ये अनोळखी व्यक्तींना प्रवेश देऊ नये तसेच संशयास्पदरित्या वावरणाऱ्या व्यक्तींची तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.









