सिव्हिल हॉस्पिटल आवारात थरार : तलवारीने सपासप वार : आरोपीला अटक
प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील रखवालदार (सेक्मयुरिटी गार्ड) महिलेचा भीषण खून करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात हा थरार घडला. तलवारीने सपासप वार करून तिचा खून करण्यात आला असून प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील गणेश मंदिराच्या पाठीमागे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बैलहोंगल येथील एका तरुणाला अटक केली आहे.
सुधाराणी बसवराज हडपद (वय 29, मूळची रा. मुगबसव, ता. बैलहोंगल, सध्या रा. कंग्राळी खुर्द) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. इराण्णा जगजंपी (वय 22, रा. बैलहोंगल) या माथेफिरूने तिचा खून केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या जवळून धारदार तलवार ताब्यात घेण्यात आली आहे.
घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवागारात हलविण्यात आला.
वर्षाचा शेवट खून प्रकरणाने
आरोपी इराण्णा हा सुधाराणीला सतावत होता. बैलहोंगलमध्ये काही प्रमुखांनी त्याला बोलावून समज दिली होती. त्यानंतरही तो सुधाराणीचा पाठलाग करीत होता. ती रोज रात्रपाळी करायची. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री आई रत्नव्वाशी ती बोलली होती. बुधवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटल आवारात सुधाराणी व इराण्णा यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील उपलब्ध झाला नाही. 2020 मध्ये बेळगाव शहरात अनेक खून प्रकरणे घडली. वर्षाचा शेवटही खून प्रकरणाने झाला.
तो मूळचा बैलहोंगल येथील राहणारा असून गवंडी काम करतो. सुधाराणी प्रसुती विभागासमोर रात्रपाळीवर होती. सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास हजेरी घालण्यासाठी ती मेडिकल वॉर्ड असलेल्या इमारतीकडे जात होती. तिच्या समवेत तिची आणखी एक मैत्रिण गायत्री कलमठ हीही होती.
प्रसुती विभागापासून कॅन्टीनकडे जाणाऱया वाटेवर इराण्णाने सुधाराणीला गाठले. त्यावेळी हे माझ्या ओळखीचे आहेत थोडे बोलायचे आहे, तू पुढे जा, असे सांगत सुधाराणीने गायत्रीला पुढे पाठविले. थोडावेळ दोघांमध्ये बोलणे झाले. त्यानंतर तलवारीने सुधाराणीवर सपासप वार करण्यात आले. जवळच असलेल्या गायत्रीने हा प्रकार पाहिला. ती घाबरून गेली. इराण्णाने तिलाही तलवार दाखविताच तिने तेथून पळ काढला. धावत जाऊन गायत्रीने चेतन हवालदार या आपल्या सुपरवायझरला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर सारे घटनास्थळी दाखल झाले. मुगबसव येथील सुधाराणीच्या कुटुंबीयांना ही घटना कळविण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटलमधील हवालदार बसवराज यरनाळ हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वरि÷ अधिकाऱयांनाही पाचारण करण्यात आले.
सुधाराणीची आई रत्नव्वा व वडील बसवराज व इतर कुटुंबीय सिव्हिल हॉस्पिटल आवारात दाखल झाल्यानंतर शवागारात सुधाराणीचा मृतदेह पाहून त्यांनी एकच आक्रोश केला. उत्तरीय तपासणीनंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ती गेल्या आठ महिन्यांपासून सिक्मयुरिटी गार्ड म्हणून कंत्राटीपद्धतीने काम करीत होती.
बहिणीच्या लग्नाला पैसे कमवायला आली…
सुधाराणीचे लग्न झाले होते. मंग्यानकोप्प येथे तिचा विवाह करून दिला होता. मात्र या दाम्पत्यात कौटुंबिक कलह निर्माण झाला. सध्या हा वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे ती माहेरी होती. तिला सृष्टी नावाची 11 महिन्यांची मुलगी होती. त्या मुलीचाही अकाली मृत्यू झाला आहे. बहिणीच्या लग्नासाठी पैसे कमविण्यासाठी म्हणून सुधाराणी बेळगावला आली. गेल्या आठ महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रखवालदार म्हणून ती सेवा बजावत होती. पुढच्या महिन्यात बहिणीचे लग्न ठरले होते. त्यामुळे त्या तयारीत असतानाच बुधवारी सकाळी तिचा भीषण खून झाला आहे.









