बेळगाव, खानापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर म. ए. समितीची बाजी, भगवा फडकवून केला आनंदोत्सव
ग्रामपंचायत निवडणूक कोणत्याही पक्षाच्या झेंडय़ाखाली किंवा पुरस्कृतरित्या लढविता येत नाही. मात्र निवडणुकीला उभे राहणाऱया उमेदवारांच्या पाठिशी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रीय पक्षाचा छुपा पाठिंबा हा असतोच. यावेळी झालेल्या निवडणुकीत बेळगाव व खानापूर तालुक्यात राष्ट्रीय पक्षांना दणका देत म. ए. समितीने वर्चस्व कायम राखले आहे. सर्वपक्षीय आघाडय़ांनी वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र म. ए. समितीने आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा राखला आहे. येळ्ळूर, बेनकनहळ्ळी, मुचंडी, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक यासह इतर ग्रामपंचायतींमध्ये म. ए. समितीने भगवा फडकविला आहे.
प्रतिनिधी / बेळगाव
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मराठी भाषिकांचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले असून इतर पक्षात गेलेले उमेदवारही हे मराठी भाषिकच आहेत. त्यामुळे तालुक्मयातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर मराठी भाषिकांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. काही ठिकाणी राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार विजयी झाले तरी ते मराठी भाषिक असल्यामुळे मराठीसाठी एकजूट करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांनी वर्चस्व राखले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय पक्षांनी आपली ताकद आजमावली. बऱयाच ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात मराठी भाषिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नासाठी लढत असलेल्या मराठी भाषिकांनी नेहमीच म. ए. समितीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करुन दरवेळी महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे.
न्यायाची मागणी…
मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार नेहमीच अन्याय करत असते. सध्या सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल असून आपली मागणी न्यायाची असल्याचे मराठी भाषिक मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. येणाऱया सर्वच निवडणुकांमध्ये एकजुटीने राहून मराठी भाषिकांनी सडेतोडपणे उत्तर देणे ही काळाची गरज बनली आहे.
सडेतोड उत्तर…
- सकाळपासूनच कार्यकर्त्यांचे निकालाकडे लक्ष
- विजयोत्सवात ‘जय शिवाजी जय भवानी’ घोषणा
- मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी
- मतदान केंद्राजवळ गोंधळाचे वातावरण
नियोजनाच्या अभावामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर उमेदवार, एजंटांची लांबलचक रांग
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बी. के. मॉडेल स्कूलमध्ये मतमोजणी केंद्र करण्यात आले. मात्र यामुळे मुख्य रस्त्यावरच मोठी गर्दी होत होती. नियोजनाच्या अभावामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. एकूणच मतमोजणी गोंधळातच पार पडली. यामुळे शहरातील जनतेबरोबरच तालुक्मयातील जनतेतूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मतमोजणी केंद्राजवळ अधिक सुरक्षितता ठेवण्यात आली होती. उमेदवार आणि एजंटांना प्रवेश करण्यासाठीही लांबच्यालांब रांगा लावाव्या लागत होत्या. त्यामुळे मोठा गोंधळ उडत होता. तीन टप्प्यात मतमोजणी होती. ही मतमोजणी अत्यंत संथगतीने सुरू होती. कोणत्या ठिकाणी कोणत्या ग्राम पंचायतीची मतमोजणी सुरू आहे हे देखील समजले नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत होते. वास्तविक 55 ग्रामपंचायती असल्याने मोठे महाविद्यालय तसेच शहराच्या बाहेरच्या बाजूला मतमोजणी होणे गरजेचे होते. मात्र मध्यवर्ती ठिकाणीच मतमोजणी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
मोबाईल वापरावर बंदी
उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. आतमध्ये जाणाऱयांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते.
मास्क नाही…सॅनिटायझरही नाही
कोरोनाचे नियम पाळण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र त्या पद्धतीने नियोजनच करण्यात आले नाही. त्यामुळे सर्व नियमच धाब्यावर बसविण्यात आले होते. तोंडाला मास्क नाही, सुरक्षित अंतर नाही, सॅनिटायझर नाही यामुळे गोंधळाची स्थिती दिसून आली.
मतमोजणीतील गोंधळाने निकालास उशीर
एका ग्रामपंचायतीची संपूर्ण मतमोजणी एकाच टप्प्यात न झाल्याने संभ्रमावस्था
ग्रामपंचायतीच्या वॉर्डांचा निकाल लागताना नियोजन करणे गरजेचे होते. एका वॉर्डाचा निकाल एका ठिकाणी तर दुसऱया वॉर्डाचा निकाल दुसऱया ठिकाणी, यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मतमोजणी अत्यंत संथगतीने होत होती. वास्तविक विभागवार प्रत्येक ग्रामपंचायतीचा निकाल एकाचवेळी बाहेर पडणे गरजेचे होते. मात्र काही वॉर्डांचा निकाल लवकर तर काही वॉर्डांचा निकाल उशिराने दिला जात होता. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
बी. के. मॉडेल स्कूलमधील खोल्या लहान असल्यामुळे त्या ठिकाणीही मोठा गोंधळ उडत होता. वास्तविक यासाठी मोठय़ा महाविद्यालयाची गरज होती. मात्र याबाबत कोणताच विचार करण्यात आला नाही. त्यामुळे तीन टप्प्यात मतमोजणी झाली तरी सुसूत्रपणा अजिबात नसल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना मत पाहताना देखील अडचण निर्माण होत होती. नेमके काय चालले हेच समजणे अवघड झाले होते.
काही ग्रामपंचायतांचा निकाल लवकर लागत होता तर काही ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार अधिक असल्यामुळे त्याला उशीर लागत होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील काही ग्रामपंचायतींचा निकाल दुसऱया टप्प्यातील निकालाबरोबरच बाहेर पडले. एकूणच मतमोजणीत सुसूत्रता नसल्यामुळे आणि अधिकाऱयांचे नियंत्रण नसल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती.









