प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाच्या (आयसीटीई) आदेशानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील रात्री (नाईट) चालणारी इंजिनिअरिंग कॉलेजीस बंद करण्यात येणार आहेत. रात्री चालणाऱया या कॉलेजचा समावेश आता नियमित कॉलेजमध्ये करण्यात येणार आहे.
तथापि, लॅटरल एन्ट्री व 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे व जे सध्या 5, 6, 7, 8 सेमीस्टरमध्ये शिकत आहेत त्यांचे कॉलेज पुढे सुरू राहील. मात्र, नाईट कॉलेज बंद झाल्याने नोकरी करून संध्याकाळी शिक्षण घेत पदवी प्राप्त करू इच्छिणाऱया डिप्लोमाधारकांचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.
राज्यामध्ये एकूण सरकारी, अनुदानित व खासगी अशी 12 नाईट कॉलेज आहेत. दहावीनंतर ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांनाच या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. बहुसंख्य गरजू व होतकरू विद्यार्थी दिवसा नोकरी करून रात्री शिक्षण घेत होते. परंतु आता त्यांचे स्वप्न अधुरे राहणार आहे.
अशा कॉलेजच्या देखभालीचा खर्च अधिक असल्याने ती कॉलेज बंद करण्यात येत आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे. आयसीटीईच्या कक्षेत येणारी सर्व नाईट कॉलेजीस बंद केली जातील व नियमित कॉलेजमध्ये विद्यार्थीसंख्या वाढल्याने दोन सत्रात कॉलेज भरविण्याचा विचार करावा लागेल, असे बेंगळूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. के. आर. वेणुगोपाल यांचे मत आहे.
दरम्यान, नाईट कॉलेज बंद करण्याची जी यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये बेळगावच्या दोन कॉलेजीसचा समावेश होता. यामध्ये जीआयटीचेही नाव होते. मात्र, जीआयटीच्या सूत्रांशी संपर्क साधता लॉकडाऊनच्या काळात सायंकाळच्या सत्रात ऑनलाईन वर्ग घेतले गेले होते. मात्र, जीआयटीचे नाईट कॉलेज नाही तर हे वर्ग आता बंद झाले आहेत, अशी माहिती मिळाली.









