केंद्रीय अर्थमंत्र्यांचे भाकित, आर्थिक सर्वेक्षण सादर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण 1 फेब्रुवारीला होणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारने शुक्रवारी सध्याच्या आर्थिक वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आले. आगामी आर्थिक वर्षात आर्थिक विकासाचा दर 11 टक्के असा भक्कम राहील असे भाकित सर्वेक्षणात वर्तविण्यात आले आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.7 टक्क्यांनी आटलेला असेल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनामुळे केंद्र सरकारला लॉकडाऊनची घोषणा करावी लागली. मात्र, लॉकडाऊनमुळे संभाव्य रूग्णसंख्येत 37 लाखांची, तर संभाव्य मृतांच्या संख्येत 1 लाखाची घट झाली, असेही प्रतिपादन सर्वेक्षणात करण्यात आले आहे.
विकासातील ही घट किंवा अकुंचन विक्रमी आहे. 1979-1980 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 5.2 टक्के आकुंचन पावली होती. त्यानंरचे हे सर्वात मोठे आकुंचन आहे. चालू आर्थिक वर्षात केवळ कृषी क्षेत्राचा विकासदर 3.5 टक्के असा सकारात्मक राहिला. इतर क्षेत्रांचा विकास दर उणे राहिला. सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र या महत्वाच्या क्षेत्रांना कोरोना उद्रेकाचा मोठा फटका बसला असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
आगामी वर्ष समाधानकारक
चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विकास दर नकारात्मक राहणे साहजिक होते. केवळ भारताचीच नव्हे तर जगाचीही अर्थव्यवस्था या काळात मंदावलेलीच राहिली. मात्र, आगामी आर्थिक वर्ष, अर्थात, 2021-2022 हे आर्थिक वर्ष समाधानकारक राहणार असून त्यात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर 11 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही आगामी वर्षात भारताचा विकास दर 11.5 टक्के राहील असे अनुमान दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते, असे सांगण्यात आले.
सुधारणांचा लाभ मिळणार
कोरोना काळात आणि त्याच्या पूर्वीही केंद्र सरकारने अनेक आर्थिक सुधारणांना गती दिली. त्याचा परिणाम आगामी आर्थिक वर्षात जाणवणार आहे. सध्या अर्थव्यवस्था मंदावलेली असली तरी भरारी घेण्याची तिची पायाभूत क्षमता आहे. या क्षमतेचे प्रत्यंतर आगामी वर्षांमध्ये येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
वाढ कशामुळे होणार
सुदृढ पुरवठा साखळी, निर्बंधांमधील शिथिलपणा, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य, उत्पादन क्षेत्रातला प्रोत्साहन, उत्पादकता संबंधित सवलती, सेवा क्षेत्रात मागणीची वाढ, कमी व्याजदर, रोख रकमेची उपलब्धता आणि कोरोना लसीच्या उपलब्धतेनंतर वाढलेली मागणी या सर्व घटकांमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वेगाने सुधारताना दिसत आहे, असे प्रतिपादन सर्वेक्षणात आहे.
व्यापारी तूट मिटली
17 वर्षांनंतर प्रथमच व्यापारी तुटीची समस्या यंदा जाणवणार नाही. उलट यासंर्भात आपण सकारात्मक स्थितीत आहोत. आयात कमी झाल्याने व्यापारी खात्यावर 2 टक्के अधिकची रक्कम चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत असेल, असे आशादायक अनुमान सर्वेक्षणा काढण्यात आले आहे.
जगात आघाडीवर राहणार
आगामी आर्थिक वर्ष आणि त्यापुढचे वर्ष अशी दोन वर्षे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असे भाकितही वर्तविण्यात आले आहे. भारतात कोरोना स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. परिणामी आर्थिक व्यवहार आता झपाटय़ाने पूर्ववत होत आहेत. साहजिकच आर्थिक विकासाचा वेग सर्वाधिक राहिल्यास आश्चर्य नाही, असे सांगण्यात आले आहे.









