इस्त्रायली दुतावासाबाहेरील घटना- कमी क्षमतेमुळे जीवितहानी टळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी आयईडीद्वारे बॉम्बस्फोट घडविल्याने खळबळ निर्माण झाली. या बॉम्बस्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. मात्र स्फोटामुळे परिसरात पार्क करण्यात आलेल्या चार-पाच वाहनांच्या काचा फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली परिसर तणावाच्या छायेत असतानाच हा स्फोट झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीतील सुरक्षा अतिदक्ष करण्यात आली असून घटनास्थळी एनआयए आणि फोरेन्सिक पथकाने तपास सुरू केला आहे.
मध्य दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी स्फोट झाल्याचे सुरक्षा सूत्रांनी सागितले. विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. विजय चौकवर प्रजासत्ताक दिनानंतरचा बीटिंग रिट्रिट या सोहळय़ासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरि÷ सदस्य उपस्थित असतानाच हा स्फोट घडविण्यात आला. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला आहे. तसेच विमानतळ, संसद भवनासह सरकारी इमारतींची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलीस आयुक्तांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधत त्यांना स्फोट आणि तपासाविषयी सविस्तर माहितीही दिली आहे.
दुतावास इमारत सुरक्षित
इस्त्रायली दुतावासाबाहेर झालेल्या या स्फोटात इमारतीचे काहीही नुकसान झालेले नाही. इस्त्रायल दुतावास तुगलक रोड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर आहे. त्याच्या जवळील बंगला क्रमांक 6 समोर हा स्फोट झाला आहे. या स्फोटासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी दुतावास अधिकाऱयांच्या संपर्कात आहेत. तसेच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यासंबंधी इस्त्रायली परराष्ट्र मंत्र्यांशीही संपर्क साधत स्फोटासंबंधी माहिती दिली. या भागातच काही वर्षांपूर्वी एक अज्ञात बाईकस्वार बॉम्ब फेकून फरार झाला होता.
कारमधून स्फोटके फेकल्याचा संशय
आयईडीच्या स्वरुपातील स्फोटकांद्वारे स्फोट घडविल्याचा दावा करण्यात आला आहे. स्फोटके प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर टाकण्यात आल्याचे समजते. कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी ही स्फोटके फेकली असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संबंधित कारचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहेत. घटनास्थळी गुप्तचर विभाग, एनआयए पथक आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
शोधकार्यासाठी तीन पथके नियुक्त
या स्फोटाच्या तपासासाठी सध्या दिल्ली पोलिसांनी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकातील अधिकारी फरार झालेल्या संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. संशयितांच्या अटकेसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.









