वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यात क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता, जागतिक क्रीडा विश्व हळूहळू पूर्वपदावर येत असून टेनिस विश्वातील प्रतिष्ठित अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेला 31 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यंदाही आयोजकांनी बक्षीस रक्कम जवळपास गतवर्षीच्या बक्षीस रकमेएवढीच ठेवली आहे. पुरुष व महिला एकेरी विजेत्याला 30 लाख डॉलर मिळणार असून एकूण बक्षीस रक्कम 5 कोटी 34 लाख डॉलर इतकी असणार आहे.
महिला एकेरीत पहिल्या फेरीची बक्षीस रक्कम 5 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा ही रक्कम 58 हजार डॉलरवरून 61 हजार डॉलर आहे. दुसऱया व तिसऱया फेरीची रक्कम गतवर्षीएवढीच आहे. याशिवाय अमेरिकन टेनिस असोसिएशनने 76 लाख डॉलरची रक्कम खेळाडूंना अर्थसहायासाठी ठेवली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय टेनिस बंद असल्याने व्यावसायिक टेनिसपटूंचे उत्पन्न ठप्प आहे. याआधीसुद्धा खेळाडूंच्या मदतनिधीसाठी त्यांनी 10 लाख डॉलरचे योगदान दिले आहे. यानंतर आता पात्रता स्पर्धा घेणार नसल्याने आणि दुहेरीचा ड्रॉ कमी जोडय़ांचा असल्याने यूएसटीएने 66 लाख डॉलरचे अनुदान दिले आहे. ही रक्कम पुरुष व महिला खेळाडूंमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
यंदाची बक्षीस रकमेची विभागणी
पुरुष व महिला एकेरी
विजेता- 30 लाख डॉलर
उपविजेता- 15 लाख डॉलर
उपांत्य फेरी- 8 लाख डॉलर
उपांत्यपूर्व फेरी- 4 लाख 25 हजार डॉलर
चौथी फेरी- 2 लाख 50 हजार डॉलर
तिसरी फेरी- 1 लाख 63 हजार डॉलर
दुसरी फेरी- 1 लाख डॉलर
पहिली फेरी- 61 हजार डॉलर









