भारताकडून धोका असल्याचा कांगावा
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
जागतिक कूटनीतिक स्तरावर एक अशी घटना घडली आहे, जी एखाद्या थट्टेपेक्षा कमी नाही. बलात्काराचा आरोपी आणि स्वयंघोषित देव असलेल्या नित्याकडून स्थापन करण्यात आलेला काल्पनिक देश ‘कैलाशा’चा एक प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका बैठकीत सामील झाला आहे. या बैठकीत या प्रतिनिधीने भारताविरोधात गरळ ओकली आहे. नित्यानंद हे ‘हिंदू धर्मातील सर्वोच्च गुरु’ असून त्यांचा छळ केला जात असल्याचे म्हणत कथित कैलाशाच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

नित्यानंदची बाजू मांडण्यासाठी विजयप्रिया नित्यानंद नावाची महिला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांच्या (सीईएसआर) 19 व्या बैठकीत सामील झाली. ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलाशा’चे संस्थापक नित्यानंदचा भारत छळ करत आहे. कैलाशा हे हिंदू धर्माचे पहिले सार्वभौम राज्य असून कैलाशातील 20 लाख हिंदू आणि नित्यानंदचा छळ रोखण्यात यावा असे विजयप्रिया यांनी म्हटले आहे.
युएनच्या मान्यतेबद्दल संभ्रम
15 देशांमध्ये कैलाशाचे दूतावास आणि स्वयंसेवी संघटना स्थापन करण्यात आल्याचा दावा विजयप्रिया यांनी बैठकीला संबोधित करताना केला आहे. परंतु कैलाशाला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर मान्यता दिली असल्यास नित्यानंदला काल्पनिक देशाचा प्रमुख कुठल्या प्रक्रियेच्या अंतर्गत करण्यात आले हे देखील समोर आलेले नाही. नित्यानंद हा लैंगिक शोषणाप्रकरणी फरार आरोपी आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये गुजरात पोलिसांनी नित्यानंदला फरार घोषित केले होते. पोलीस त्याच्या आश्रमातील मुलांच्या अपहरणाशी निगडित आरोपांप्रकरणी चौकशी करत होते.
वादग्रस्त पार्श्वभूमी
ऑक्टोबर 2022 मध्ये ब्रिटनच्या संसदेत होणाऱया दिवाळी पार्टीसाठी नित्यानंदच्या समर्थकांना आमंत्रित केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. इंटरपोलने नित्यानंद विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यास नकार दिला आहे. परंतु एका काल्पनिक देशाच्या प्रतिनिधीला अत्यंत प्रतिष्ठित आयोजनांमध्ये सामील होऊ देणे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्थान मिळाल्याने लैंगिक शोषणाच्या आरोपीला अभय मिळू शकते असेही बोलले जात आहे.









