तिवरेतील बाधितांचा सवाल
प्रतिनिधी/ चिपळूण
दोन वर्षांपूर्वी धरणफुटीत आपला घर संसार आणि परिवार उद्ध्वस्त झालेल्या तिवरे भेंदवाडी येथील धरणग्रस्तांची ससेहोलपट अजूनही थांबलेली नाही. अलोरे येथे बांधून पूर्ण झालेल्या 24 घरांचे लोकार्पण दीड महिन्यांपूर्वी होऊनही त्यातील 14 घरे अद्यापही प्रशासनाने बाधित कुटुंबांच्या ताब्यात दिलेली नाहीत. गेल्या दोन वर्षापासून गणेशोत्सव साजरा न करता आलेल्या या बाधितांना यावर्षी तरी गणेशोत्सव हक्काच्या घरात होईल का? असा प्रश्न पडला आहे.
दोन वर्षापूर्वी झालेल्या धरण फुटीत भेंदवाडीमधील 24 घरे वाहून गेली. या घरांत 45 कुटुंबे रहात होती. या घरांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा राज्य शासनाने निर्णय घेतला. मुंबई येथील सिद्धीविनायक ट्रस्टच्या 12 कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात अलोरे येथे 24 घरे बांधण्यात आली. त्या घरांचा लोकार्पण सोहळा 2 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आणि अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पार पडला. मात्र लोकार्पणानंतर घरांमध्ये गळती असल्याने बांधकाम विभागाने घरांच्या चाव्या पुन्हा परत घेतल्या होत्या. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
दरम्यान, तिवरे येथे कंटेनरमध्ये रहात असलेल्या 12 पैकी 10 कुटुंबांना लोकार्पणानंतर पंधरा दिवसांनी घराचा ताबा देण्यात आला. उर्वरित 14 घरे तयार आहेत. मात्र त्यांचा ताबा देण्यात आलेला नाही. येथील प्रशासनाकडून अजूनही त्याबाबत काही हालचाली दिसत नाहीत. घर नसल्याने बाधीत कुटुंबांनी गेली दोन वर्षे गणपती आणलेला नाही. तिसऱया वर्षी तरी कुटुंबांचा गणेशोत्सव आपल्या हक्काच्या घरी होईल, अशी त्यांना आशा होती. मात्र गणेशोत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही प्रशासनाकडून अजून कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे बाधितांच्या जीवाची घालमेल सुरू झाली आहे.









