राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा हा स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे. त्याचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आदरनिय पवारसाहेब करत आहेत. 2003 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या कार्यालयाची इमारत उभी केली. त्याच इमारतीचे आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कार्यकर्त्यांनी नुतनीकरण चांगले केले आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी काढले.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, कृषी सभापती मंगेश धुमाळ, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सत्यजीतसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षिरसागर, सुरेंद्र गुदगे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगिता साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.समिंद्रा जाधव, राजेश पाटील-वाठारकर, ऍड. राजाभाऊ उंडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शाफिक शेख, सोनाली पोळ, स्मिता देशमुख तसेच पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले, 2003 मध्ये जे पदाधिकारी होते. लक्ष्मणतात्या असतील आम्ही होतो. त्यावेळी पक्षाचे कार्यालय करण्यात आले. या कार्यालयाला 19 वर्ष झाली. पालकमंत्री बाळासाहेब पाटलांनी पुढाकार घेतला हे कार्यालय नव्याने झाले. स्वच्छतागृह व्यवस्थीत केलेले आहे. अध्यक्षांचे चेबर. महिलांचे चेंबर व्यवस्थित करुन घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. साईडची वॉल पडलेली होती. ती आरसीसी वॉल करण्यात आलेली आहे. मधल्या काळात काही कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काही गोष्टी केल्या होत्या. मीडियानेही दाखवले होते. त्यातही नुकसान झाले होते. त्या सगळय़ाच गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. स्पर्धा परिक्षेकरता मार्गदर्शन केंद्र आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने एक ग्रंथालय केलेले आहे. 12 डिसेंबर 2012 ला याची सुरुवात झाली. त्याचा लाभ 1187 विद्यार्थ्यांनी घेतला. आता एक मुलगी वाचत होती. तीला म्हटल कुठली ग. ती म्हणली महाबळेश्वरची. होस्टेलला राहते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येथे. शांतता असते. पुस्तके सगळी मिळतात. सेफ आहे. सुरक्षित आहे, असे तिने सांगितले. या अभ्यासिकेतून 95 विद्यार्थी सिलेक्ट झाले. 72 विद्यार्थी होते तर 18 विद्यार्थीनी होत्या. जवळपास 1342 पुस्तके ठेवलेली आहे. वर्तमानपत्र, मासिके आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नुसते राजकारण करत नाही तर समाजकारण पण करते. पवारसाहेब नेहमी सांगतात की 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण केले पाहिजे. चांगली सुविधा आमच्या पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजकुमार पाटील यांचे कौतुक
राजकुमार पाटील हे पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतात ही बाब अजितदादांनी हेरली अन् त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे दिवंगत कार्यकर्ते सुधीर धुमाळ यांची आठवण करुन देत राजकुमार पाटील यांचे कौतुक त्यांनी केले. दरम्यान, त्यांनी सर्व इमारत फिरुन पाहिली. अगदी बारकाईने रंगापासून, हॉल चांगला केला आहे, याचेही कौतुक त्यांनी केले.








