प्रधानमंत्री ग्रामीण आवास प्लस ‘ड’ यादीसाठी जिल्हय़ात निकषांची पडताळणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या आवास प्लसच्या ‘ड’ यादीसाठी पात्र लाभार्थ्यांचा समावेश करताना यातून नोंद झालेले 14 हजार 498 प्रस्ताव रद्द करण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडून सांगण्यात आले. शासनाच्या निकषानुसार रद्द ठरवताना घरात फ्रीज असणे, चिरेबंदी घर, दोनपेक्षा जास्त खोल्या असणे तसेच रोजगार हमी योजनेवर काम केलेले नसणारे लाभार्थी पडताळणीत दिसून आले आहेत.
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत 2022 पर्यंत ‘सर्वांना हक्काचे घर’ देण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हय़ात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निकषात न बसणाऱया लाभार्थ्यांना या योजनेच्या यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी आता ‘आवास प्लस’ यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यत जिह्यात एकूण 78 हजार 746 लाभार्थींनी आवास प्लस ‘ड’ यादीत नोंदणी केली होती. केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजनेचे निकषही बदलण्यात आले आहेत. 2002 ची दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थ्यांची यादी रद्द करून 2011 च्या सामाजिक, आर्थिक जनगणनेच्या यादीनुसार या योजनेसाठी लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्याची ऑनलाईन नोंदणीही करण्यात आली. या यादीला अंतिम मंजुरी देण्याचे काम ग्रामसभेकडे सोपवण्यात आले होते. ‘आवास प्लस’च्या ग्रामसेवकांनी तयार केलेल्या यादीची केंद्र शासनाच्या अधिकाऱयांकडून सॉफ्टवेअरमार्फत तपासणी करण्याची कार्यवाही झाली.
या योजनेच्या 2011च्या आर्थिक, सामाजिक व जातनिहाय जनगणनेनुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. या योजनेच्या ‘ब’ यादीत समावेश नसलेल्या लाभार्थ्यांसाठी आवास प्लस अंतर्गत ‘ड’ यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची ड यादी कार्यान्वित केली जाणार आहे. प्रथम संभाव्य लाभार्थी नोंदणी केली होती. निकषानुसार त्या लाभार्थ्यांची पडताळणी वरिष्ठ स्तरावरून करण्यात आली. त्यामध्ये पात्र व अपात्र ठरलेल्यांची ड यादी प्रसिद्ध झाली आहे. जिह्यात एकूण 78 हजार 746 लाभार्थींनी ‘आवास प्लस’च्या ड यादीसाठी नोंदणी केली होती. पडताळणीतून त्यातील 60 हजार 862 लाभार्थी पात्र ठरले आहेत. 14 हजार 489 लाभार्थी यातून अपात्र करण्यात आले आहेत. या योजनेच्या कार्यवाहीत नावे यादीत नसलेल्या बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी आवास प्लस ‘ड’ अंतर्गत अशा बेघरांची नोंदणीतून पडताळणी करण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.
केंद्रस्तरावरून पडताळणीत प्रस्ताव रद्दची कार्यवाही
प्रधानमंत्री आवास प्लस ‘ड’ यादीत रत्नागिरी जिह्यातील सुमारे 14 हजार 489 लाभार्थ्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. निकषात न बसल्यामुळे ही यादी केंद्र स्तरावरुनच रद्द झाली आहे. ड यादी प्रसिद्ध करताना ज्या लाभार्थ्यांनी मनरेगांतर्गत काम केले आहे, त्यांचा विचार केला गेला आहे. ज्यांनी ‘मनरेगां’तर्गत कामात समावेश नाही ते आवासच्या लाभापासून वंचित ठरले आहेत. ज्यांनी दोनपेक्षा जास्त खोल्या असल्याचे दाखविले आहे, त्यांना आवासच्या लाभातून वगळण्यात आले आहे.









