काही दिवसांपूर्वी आम्ही काही मित्र भेटलो होतो, बऱयाच दिवसांनी भेट झाल्यामुळे गप्पा जोरात चालल्या होत्या. आम्ही सर्व वेगवेगळय़ा क्षेत्रामध्ये काम करत असल्याने विषय व अनुभव शेअर करणे चालू होते. गप्पा हळूहळू सायबर विषयाकडे वळला. घडत असलेले सायबर क्राईम, सायबर गुन्हेगारांची तसेच बळी ठरलेल्यांची मानसिकता ह्याची चर्चा सुरु झाली. दरम्यान अर्चनाने लहान म्हणजे पौगंडावस्थेतील मुले “ऑनलाईन’’ राहिल्याचे परिणाम कसे होतात ह्यासंदर्भातले प्रसंग सांगितले. अर्चना मुळे ही मानसशास्त्राचा अभ्यास करून आता समुपदेशन तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर ती सांगत होती की एक 13-14 वर्षाची मुलगी तिच्याकडे आली. वडील घेऊन आले. शाळा व क्लासच्या निमित्ताने सतत “ऑनलाईन’’ राहणे. लॉकडाऊनमध्ये बाहेर खेळायला जाणेही मुश्कील. मात्र जेव्हा संधी मिळाली तेव्हा मित्र मैत्रिणींबरोबर खेळायला बाहेर. काही नवीन ओळखी झाल्या. फोनची अदलाबदल झाली. पण परत लॉकडाऊन सुरु. ह्या फोनवरुन मग चॅटींग सुरु झाले व ती मुलगी त्या नवीन ओळख झालेल्या मुलांमध्ये गुंतली….. मग सुरु झाला पुढचा प्रवास…… इन्स्टाग्रामवर अकाउंट… रिल्सचे व्हिडीओ…..फोटो शेअरिंग… असे काही दिवस गेले…. आणि अचानक त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाच्या लक्षात आले, वडिलांना सांगितले, वडिलांनी अकाऊंट पाहिले आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तात्काळ अकाऊंट बंद करण्याची प्रक्रिया केली व तिला काऊंसिलरकडे घेऊन आली.
असाच दुसरा प्रसंग सांगितला. एक 15-17 वर्षाचा मुलगा. लॉकडाऊनचाच काळ. “ऑनलाईन’’ राहणे. क्लास शाळा सुरु झाल्या होत्याच. मल्टीटास्कींग फोन असल्याने मुले नक्की काय करतात ते पालकांना समजत नाही. हा मुलगा शाळा, क्लास सुरु ठेवून लॉगइन करुन फेसबुकवर असायचा. कॉमेंट करणे फोटो शेअर करणे सुरु होते. थोडा धीर आल्यानंतर फेसबुक ग्रुपमध्ये सामिल झाला. ऍडल्ट पोस्ट टाकल्या जाणाऱया ह्या ग्रुपमधून पोर्न साईट बघण्याचा नाद लागला. त्यातून जो परिणाम व्हायचा तो झालाच.
आमच्या गप्पा संपल्या. आम्ही घरी परतलो. मात्र माझ्या मनामध्ये हा विषय घोळत राहिला. ह्या अशा पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोबाईल मिळाला. ऑनलाईन राहण्याचा नाद लागला. ह्यातून सायबर गुन्हे घडायला किंबहुना बळी पडण्याची शक्मयता वाढीस लागली. अशातून सायबर स्टेकिंग, ग्रुमिंग, बुलिंग, पोर्नोग्राफी व काही प्रमाणात पैशाचे व्यवहार गेम्ससाठी केले जातात. मुलांची मानसिकता ह्या “ऑनलाईन’’ मुळे बिघडत चालली आहे हे आजचे सत्य. म्हणूनच थोडा विषय बदलून आज सायबर गुन्ह्य़ाला बळी पडणे किंवा घडणे ह्या मागची मानसिकता काय याविषयी थोडे लिहावे असे वाटले व अर्चना मुळे हिच्याशी सविस्तर बोलणेही केले.
आज तारखेला प्रत्येक बाबतीत “ऑनलाईन’’ राहणे गरजेचे झाले आहे. लहान मुलांपासून ते अगदी महाविद्यायलीन मुलांपर्यंतचे शिक्षण मोबाईलवर सुरु झाले आहे. त्यामुळे नको असलेल्या वयामध्ये मोबाईलसारखी वस्तू हातात मिळाली आहे. वापरायचे कसे, किती वापरायचे इ. बाबींचे शिक्षण अजून ह्या लहान मुलांमध्ये आलेले नाही. पालकांचे अनुकरण करणे हे मुलांना माहित असल्याने किंबहुना ते नैसर्गिक असल्याने मोबाईल वापरणे गैर नाही असेच त्यांना वाटते. ह्यातूनच मग सायबर गुन्ह्य़ाला बळी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. खरे तर शाळा सर्व किशोरवयीन मुलांच्या सामाजिक जीवनाचे केंद्र आहे. शाळा, महाविद्यालय किशोरवयीन आणि तरुण मुलांना त्यांच्या समवयस्कांशी संपर्क, दोस्ती साधण्याची संधी देत असते. त्यांच्यासाठी समाजामध्ये मिसळणे आणि व्यक्त होणे ही शाळा, महाविद्यालय म्हणून संधी आहे. मात्र सध्या कोरोनाच्या काळामध्ये शाळा आणि महाविद्यालये व्हर्च्युअल स्वरूपाच्या शिक्षणाकडे जात असताना, किशोरवयीन मुलांना नियमित सामाजिक संवादाशिवाय एकटे रहावयास लागत आहे. ज्याचा परिणाम म्हणजे मुलांचे बिघडत चाललेले मानसिक आरोग्य. त्यांना अस्वस्थ, निराश वाटणे, आवाजाचा टोन व पिच बदलणे, चेहऱयावरील हावभाव, डोळय़ात बघून न बोलणे किंव संपर्क करणे, एकूणच देहबोलीमध्ये होत असलेला बदल हि मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणे आहेत. अशा मनस्थितीत ह्या मुलांना स्वतःला शेअर करण्यासाठी कोणाची तरी गरज लागते. जर त्यांना समाजामध्ये मित्र मैत्रिणी मिळाल्या नाहीत, त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी आणि नवीन मैत्री निर्माण करण्याची संधी मिळाली नाही तर त्यांच्या मनामधील गुंता अधिक वाढत जातो. मैत्री वाढवणे, विशेषतः कमी वयोगटातील मुलांसाठी खूप महत्वाचे आहे. ज्यामुळे त्यांना स्वाभिमान मिळतो, भावना निर्माण होतात. आज ह्या सर्व गोष्टींपासून हि मुले वंचित राहात आहेत. त्यांना भावनिक संकेत वाचण्यात आणि संवाद साधण्यात अडचण येऊ लागली आहे.
मुले जेव्हा प्रत्यक्ष एकमेकांबरोबर संवाद साधत असतात तेव्हा त्यांच्या मेंदुमध्ये विशिष्ट प्रक्रिया घडत असते. असंख्य मौखिक संकेत (व्हर्बल सेंसेस) तयार होत असतात. जे संकेत ते विचार करण्यासाठी, बोलण्यासाठी, कृती करण्यासाठी वापरत असतात. “ऑनलाईन’’ प्रक्रियेमुळे मुले फक्त “स्क्रिन’’कडे पहात असतात, विचार वेगळे व कृती वेगळी अशी काहीशी अवस्था मुलांची होत असते. शाळा क्लासच्या ऑनलाईन वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात किमान संवाद असतो. यामुळे बऱयाचदा विद्यार्थ्यांसाठी एकाकीपणाची भावना निर्माण होत असते. आजचे हे “ऑनलाईन’’ शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये चिंतन, दूरस्थता आणि परस्परसंवादाचा अभाव निर्माण करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोबाईल मल्टीटास्कींग असल्याने “लॉग-इन’’ करून ठेवणे व नंतर दुसरे काहीतरी स्क्रिनवर करत राहणे, चॅटींग करणे, गेम खेळणे, युटय़ुबवरील “शॉर्टस’’ किंवा इन्स्टाग्राम वरील “रिल्स’’ पहात राहणे ह्या गोष्टी करत असतात. शिकणे ही प्रक्रिया कमी व इतर गोष्टी जास्त असे काहीसे होत असते. फोकस ठेवणे, लक्ष केंद्रित करणे मुलांना शक्मय होत नाही. मन चंचल बनत जाते. हलणारा स्क्रिन मन, मेंदू स्वस्थ व केंद्रित करु देत नाही.
ह्यातून मग मुले शेअर करण्यासाठी विविध मार्ग शोधतात. चॅटरुम किंवा चॅटींग साईट्स, थोडी फार ओळख झालेले मित्र मैत्रिणी (विरुध्द लिंगी) त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉल करणे, फोटो शेअर करणे सुरु होते. समोरील व्यक्ती मग ह्याचा फायदा उठवतात. मुलांच्या बाबतीत असे घडताना पाहून पालकही चिंता व्यक्त करीत आहेत. काही प्रमाणात शाळेच्या तासाची अनियमितता, शिक्षकांची व्हर्च्युअल शिकवण्याची पध्दत यामुळे मुले शैक्षणिकदृष्टय़ा मागे पडत आहेत की काय याची चिंता पालकांना लागली आहे. तसेच मुलांचा “स्क्रीन टाईम’’ वाढल्याबद्दल पालक चिंतित आहेत. आपली मुले सामाजिक संबंध राखण्यास कमी पडत आहेत हे पालकांच्या लक्षात येऊ लागले आहे. एकूणच सर्व स्तरावर मुलांच्या भावनिक आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत चालले आहे.
ह्या “ऑनलाईन’’चा परिणाम आजघडीला दिसणार नाही, मात्र दूरगामी परिणाम निश्चित दिसणार आहेत. मुलांचा इमोशनल क्वोशंट’’ (ई.क्मयु) हा कमी होताना दिसेल. ज्यामुळे मुलांना आयुष्यातील उद्भवलेल्या परिस्थितींना तोंड देणे, हाताळणे कठीण होत जाणार आहे. ह्याची काळजी घेणे ही आज सायबर युगामध्ये काळाची गरज आहे. पालकांची मनःस्थिती त्यांनी कोणती काळजी घ्यावी, मुलांबरोबर कसे वागावे, तसेच सायबर बळींपासून मुलांना कसे सुरक्षित ठेवावे याबाबत माहिती पुढील लेखामध्ये पाहुया.
– विनायक राजाध्यक्ष







