- 26 सप्टेंबरपर्यंत 52 लाखपेक्षा अधिक दंड वसूल
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने देखील कारवाई तीव्र केली आहे.

या अंतर्गत 20 एप्रिल ते 26 सप्टेंबरपर्यंत 14 हजार 207 मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून तब्बल 52 लाख 76 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई पालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी एप्रिलमध्येच सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीच्या काळात मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. मात्र, तरीही मास्क चा वापर केला जात नसल्याने 10 सप्टेंबरपासून हा दंड 200 करण्यात आला आहे. तसेच या 200 रुपये दंडातील 10 टक्के रक्कम घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईमध्ये मुंबई पालिकेने 52 लाख पेक्षा अधिक दंड वसूल केला आहे . त्यामुळे ‘मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर 200 रुपये भरा!’ असा इशाराच पालिकेने या कारवाईतून दिला आहे.









